कोपा अमेरिका स्पध्रेला शनिवारपासून सुरुवात यजमान अमेरिकेचा सामना कोलंबियाशी
कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या शतकमहोत्सवी वर्षांच्या जेतेपदाच्या स्पध्रेला शनिवारपासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरुवात होत असून उद्घाटनीय सामन्यात यजमान अमेरिकेसमोर २००१साली जेतेपद पटकावणाऱ्या कोलंबियाचे आव्हान असणार आहे. दक्षिण, उत्तर व मध्य अमेरिका आणि कॅरेबियन देशांमधील १६ संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा २६ जूनपर्यंत खेळविण्यात येणार आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा दक्षिण अमेरिकेच्या बाहेर खेळविण्यात येत असल्याने त्याला आणखी भव्य स्वरूप प्राप्त झाले असल्याचे म्हटले जात आहे.
यजमान अमेरिकेला १९९५च्या स्पध्रेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि आत्तापर्यंतची त्यांची ही या स्पध्रेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यंदा हे चित्र बदलून पहिल्यावहिले जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने ते मैदानात उतरणार आहेत. मात्र, ‘अ’ गटात त्यांना कोलंबिया व पराग्वे या माजी विजेत्यांसह कोस्टा रिकाचे आव्हान पेलावे लागणार आहे. कॅलिफोर्निया येथील लेव्ही स्टेडियमवर होणाऱ्या उद्घाटनीय लढतीत अमेरिका आणि कोलंबिया समोरासमोर आहेत. अमेरिका संघाचा कर्णधार मायकेल ब्रॅडलीने या शतकमहोत्सवी स्पध्रेत विशेष कामगिरी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. सलग चार विजयांसह जुर्गेन क्लिंसमन यांचा अमेरिका संघ या स्पध्रेत दाखल झाला आहे. ग्यासी झार्डेस आणि युवा खेळाडू ख्रिस्टियन पुलिसीक यांच्यावर सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. ११५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेला ब्रॅडली या क्लिंट डेम्पसीयनंतर संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो म्हणाला, ‘‘अनुभवी आणि युवा खेळाडूंची योग्य मोट बांधली आहे. माझ्या मते हा संतुलित संघ आहे आणि या स्पध्रेत चांगली कामगिरी करण्याचा खेळाडूंचा निर्धार आहे.’’
इतिहासाची पाने चाळल्यास या लढतीत कोलंबियाचे पारडे जड असल्याचे दिसेल. सलग तीन विजयांसह हा संघ कोपा स्पध्रेत दाखल झाला आहे. १२ महिन्यांपूर्वी कोपा स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारा कोलंबियाचा संघ यंदा त्याहीपुढे झेप घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. जॅक्सन मार्टिनेझ आणि रॅडमेल फॅल्काओ यांच्या अनुपस्थितीत कोलंबियाच्या आक्रमणाची जबाबदारी कार्लोस बाक्कावर असणार आहे. त्याच्या मदतीला जेम्स रॉड्रिग्ज असेल. रिअल माद्रिद क्लबमधील आपले स्थान वाचवण्याच्या दृष्टीने रॉड्रिग्ज आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे.
०३ : कोलंबिया आणि अमेरिका हे संघ कोपा अमेरिका स्पध्रेत तिसऱ्यांदा समोरासमोर येणार आहेत. १९९५च्या स्पध्रेत तिसऱ्या स्थानासाठी पहिल्यांदा हे संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते, तर २००७मध्ये त्यांच्यात दुसरा सामना झाला होता. या दोन्ही सामन्यांत कोलंबियाने विजय मिळवला होता.

०१ : कोपा स्पध्रेच्या मागील पाच लढतींत कोलंबियाला केवळ एकच गोल करण्यात यश आले आहे. गतवर्षी जेसन मुरीलोच्या गोलच्या जोरावर कोलंबियाने ब्राझिलवर १-० असा विजय मिळवला होता.
२०१४ : उभय संघांमध्ये २०१४मध्ये अखेरची मैत्रीपूर्ण लढत झाली होती आणि त्यात कोलंबियाने २-१ असा विजय मिळवला होता. कार्लोस बाक्का आणि टीओ गुटीरेझ यांनी कोलंबियाकडून प्रत्येकी एक गोल, तर अमेरिकेसाठी जोझी अ‍ॅल्टीडोरने गोल केला होता.

सामन्याची वेळ : सकाळी ७ वाजल्यापासून;
थेट प्रक्षेपण : सोनी ईएसपीएन, सोनी ईएसपीएन एचडी