आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पूर्ण सदस्यत्व १२ देशांना आहे, तर सहसदस्य राष्ट्रांची संख्या ९२ आहे. कार्यकारी मंडळात स्थान, मतदानाचा अधिकार आणि कसोटी क्रिकेटचा दर्जा हे लाभ पूर्ण सदस्यांना असतात. पण ‘आयसीसी’शी संलग्न असलेल्या राष्ट्रांची एकंदर संख्या १०४ पर्यंत उंचावली असतानाही विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मात्र फक्त १० संघांपुरती मर्यादित राहिली आहे, नव्हे २०२३च्या पुढील विश्वचषकातही संघसंख्या कायम असणार आहे.

१९७५ मध्ये विश्वचषकाच्या वैभवशाली अध्यायाला प्रारंभ झाला, तेव्हा आठ संघांनाच त्यात स्थान होते. पुढे १९८७ पर्यंत ही संख्या कायम राहिली. १९९२ मध्ये एक संघ वाढवण्यात आला. १९९६ पासून विश्वचषक स्पर्धेचा विस्तार झाला. तेव्हापासून विश्वचषकात १२ ते १६ संघ सहभागी होऊ लागले. यात काही धक्कादायक निकालसुद्धा सहसदस्य देशांच्या संघांकडून पाहायला मिळाले. १९९६ मध्ये केनियाने बलाढय़ वेस्ट इंडिजला नमवले. १९९९ मध्ये बांगलादेशने (त्या वेळी सहसदस्य) पाकिस्तानला धूळ चारली. २००३ मध्ये केनियाने संस्मरणीय कामगिरी करताना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. २००७ मध्ये आर्यलडने पाकिस्तान आणि बांगलादेशला हरवण्याची किमया साधली. मग २०११ मध्ये आर्यलडने इंग्लंडच्या ३२९ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. याच संघाने २०१५ मध्ये वेस्ट इंडिज झिम्बाब्वेला हरवले.

विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक संघसंख्या २००७च्या कॅरेबियन बेटांवर झालेल्या स्पर्धेत १६ पर्यंत वाढली होती. परंतु संघसंख्येचा आलेख याच विश्वचषकामुळे खालावला. कारण गटसाखळीत ब-गटातून भारत आणि ड-गटातून पाकिस्तान यांचे आव्हान संपुष्टात आले आणि नंतर ‘सुपर-एट’ ते अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास नीरस झाला. क्रिकेट सर्वाधिक पाहिले जाणाऱ्या भारतासह आशियाई देशांमधील दूरचित्रवाणी प्रेक्षकसंख्येचा आकडा घटला. नेमकी हीच क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी धोक्याची घंटा होती. त्यामुळे २०११ आणि २०१५ मध्ये संघसंख्येत कपात करून ती १४ करण्यात आली. मग त्यातील आणखी चार संघ कमी करण्यात आले.

१९९६ पासून गटसाखळीनंतर ‘सुपर-सिक्स’ किंवा ‘सुपर-एट’ पद्धती आणि मग उपांत्य-अंतिम फेरी अस्तित्वात होती. परंतु २००७च्या विश्वचषकाने ‘आयसीसी’ला खडाडून जागे केले. प्रमुख संघांचे अस्तित्व टिकवणे, याच उद्देशापोटी २०११ पासून ‘सुपर-सिक्स’ किंवा ‘सुपर-एट’ पद्धतीला विश्वचषकातून वगळण्यात आले. मग गटसाखळी, उपांत्यपूर्व-उपांत्य-अंतिम फेरी अशी पद्धती राबवण्यात आली. २०११च्या विश्वचषकामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील उपांत्य आणि भारत-श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्याचा दूरचित्रवाणी प्रेक्षकसंख्येचा आकडा विक्रमी ठरला होता.

यंदाच्या विश्वचषकासाठी १९९२च्या राऊंड रॉबिन पद्धतीचा पुनर्वापर करण्यात आला. प्रत्येक संघ एकमेकांशी झुंजण्याची ही जुनी पद्धती आहे. परंतु ४६ दिवस आणि ४८ सामन्यांनंतर विश्वविजेता स्पष्ट होणाऱ्या या विश्वचषकातील अखेरच्या तीन सामन्यांपर्यंत उपांत्य फेरीतील अव्वल चार संघांची उत्कंठा टिकून असेल. अर्थात यंदाच्या विश्वचषकामधील १० संघांमध्ये स्थान मिळवणे हे तितके सोपे नव्हते. विश्वचषकातील जुना संघ झिम्बाब्वेला पात्र होता आले नाही, तर वेस्ट इंडिजला पात्रतेचा अडथळा जेमतेम ओलांडून इथपर्यंत येता आले आहे, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

विश्वचषकाच्या संघसंख्येतील कपात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही मान्य नाही. जागतिक क्रिकेट विस्तारामधील हे विरुद्ध दिशेचे पाऊल आहे. त्यामुळे सहसदस्य राष्ट्रांसाठी सातत्यपूर्ण सामन्यांची संख्या कमी झाली आहे. विश्वचषकात २४-२५ संघ असावे, असे सचिनचे मत आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू मार्टिन क्रो विश्वचषकात १८ संघांची मागणी करीत आहे. भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने मागील विश्वचषकातील १४ संघसंख्येची पाठराखण केली आहे, पण ‘आयसीसी’ आपल्या भूमिकेशी ठाम आहे.

परंतु विस्तारत चाललेल्या क्रिकेटमधील सर्वोत्तमतेवर मोहोर उमटवणाऱ्या विश्वचषकात संघसंख्या अधिक असावी, यासाठीची मागणी सुरूच आहे. विश्वचषकातील अनुभवातूनच भारत, श्रीलंका, बांगलादेश यांच्यासारखे संघ परिपक्व झाले आहेत. अफगाणिस्तान, आर्यलड, केनियासारखे संघ उमेदीने देशातील क्रिकेट उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नेपाळसारखा भारताचा शेजारील देशसुद्धा क्रिकेटसाठी धडपडत आहे. त्यामुळे संघसंख्येची वाढ सकारात्मक ठरू शकते.

विश्वचषकातील संघसंख्या

   वर्ष        संघ

१९७५         ८

१९७९         ८

१९८३         ८

१९८७         ८

१९९२         ९

१९९६         १२

१९९९         १२

२००३         १४

२००७         १६

२०११         १४

२०१५         १४

२०१९         १०

२०२३         १०