संतोष सावंत

ऑस्ट्रेलियाने २०१५च्या विश्वचषकाला गवसणी घातली आणि इंग्लंडच्या राणीने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.

वास्तविक न्यूझीलंडने तसे करायला हवे होते, असे अनेक मातब्बरांचे मत होते. कारण विश्वचषकाला हुलकावणी किवी संघाला मिळाली होती. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात कधीही काहीही घडू शकते. अनिश्चितता हीच या खेळातील जान आहे. त्यामुळे या खेळाचा जन्मदाता देश असे का वागला, याकडे क्रिकेटरसिकांचे बारीक लक्ष होते.

२०१५च्या विश्वचषक स्पर्धेत अ-गटामध्ये इंग्लंडसह एकंदर सात देश होते आणि त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले होते. आपल्या गटात ते पाचव्या क्रमांकावर होते तर एकंदर गुणतालिकेत दहाव्या. असे असले तरीही २०१९चा विश्वचषक आपणच जिंकणार अशी त्यांची खात्री होती. असे वाटण्याची तीन महत्त्वाची कारणे होती. एक म्हणजे यावेळेस ते या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार होते आणि मागील विश्वचषक स्पर्धेचे दोन्हीही यजमान अंतिम फेरीत पोहोचले होते. (इंग्लंड पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करत आहे, परंतु आशा अमर आहे दुसरे काय?) दुसरे कारण म्हणजे १९७९, १९८७ आणि १९९२ अशा तीन खेपेस अंतिम फेरीत पोहोचूनदेखील त्यांना विश्वचषकावर नाव कोरता आले नव्हते आणि तिसरे कारण म्हणजे, त्यांना अगदी मनापासून तसे वाटत होते. पण यासोबत आणखीही काहीतरी विशेष करायला हवे असे इंग्लडच्या तमाम जनतेचे मत होते. पण इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी नेमके काय करायचे तेच ठरत नव्हते.

ठरले तर मग.. विश्वमेध यज्ञ आता आपल्याच भूमीवर करायचा. राणीने आपले अधिकारी मंडळ कामाला लावले. भारत हाच एकमेव देश आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करू शकतो, हा निष्कर्ष समोर आला. या महायज्ञाच्या आचार्य पदासाठी भारतातीलच क्रिकेटसम्राट सचिन यांची एकमुखाने (अहो! राणीपुढे कोण आणि काय बोलणार?) निवड करण्यात आली. त्यांनीही मोठय़ा आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली.

या महायज्ञाचे मुख्य यजमानपद ईऑन मॉर्गन महाराज भूषवणार होते. विराट, फिंच, फॅफ डय़ू प्लेसिस, गुलबदीन, विल्यम्सन, सर्फराज, करुणारत्ने, जेसन आणि मोर्तझा अशा देशोदेशीच्या १० महाराजांना आपापल्या सरदारांसह आमंत्रित करण्यात आले. ३० मे २०१९ ही तारीख निश्चित करण्यात आली. १४ जून २०१९ रोजी या महायज्ञाची समाप्ती होणार होती आणि यजमानांना फलप्राप्ती! (आता हे झाले त्यांच्या मनातले मांडे!) नियतीच्या मनात काय दडलेले आहे ते सांगून आम्ही आपल्या उत्सुकतेवर पाणी फिरवत नाही! आपण प्रत्यक्षच पाहू या ना!