तुषार वैती

बदल हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हटले जाते. क्रिकेट हा खेळही त्याला अपवाद नाही. पाच शतकांपूर्वी क्रिकेटचा जन्म झाला असला तरी त्यात आतापर्यंत अनेक बदल होत गेले. १९८४मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला, तर १९७५मध्ये विश्वचषकाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत तंत्रज्ञानात्मक आविष्कारामुळे क्रिकेटने कात टाकायला सुरुवात केली. सद्य:स्थितीला क्रिकेटमध्ये अनेक कल्पक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्यामुळे या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रेक्षकांना घरबसल्या क्रिकेटचा निखळ आनंद लुटता यावा, यासाठी तंत्रज्ञानाने निर्णायक भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञानामुळे फक्त निर्णय घेताना मानवी चुका टाळता येत नाहीत, तर खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना खेळाचे निरीक्षण करणे सोपे झाले आहे. त्यामुळे खेळाडूंनाही आपल्याला कोणत्या क्षेत्रात अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, याचे आकलन होत आहे. तंत्रज्ञानामुळे पंचांना अधिक अचूक पद्धतीने निर्णय घेण्याची संधी मिळत असल्यामुळे त्यांचे कार्य अधिक सोपे झाले आहे. सद्य:स्थितीला क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा घेतलेला हा धांडोळा

स्निकोमीटर : स्निको या नावाने ओळखले जाणारे हे तंत्रज्ञान इंग्लंडचे संगणकशास्त्रज्ञ अ‍ॅलन प्लास्केट यांनी शोधून काढले. ९०च्या दशकात या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. चेंडू बॅटची कड घेऊन गेला आहे की नाही, हे ध्वनी आणि व्हिडीयो या माध्यमातून ओळखण्याचे तंत्रज्ञान म्हणजेच स्निकोमीटर. सद्य:स्थितीला फलंदाज बाद आहे की नाही, हे तपासून पाहण्याची अचूक पद्धत असून हॉटस्पॉटच्या साहाय्याने स्निकोमीटर काम पाहते. अतिसूक्ष्म असे आवाज टिपणारा संवेदनक्षम मायक्रोफोन स्टम्पमध्ये बसवण्यात येत असून हा मायक्रोफोन ऑस्किलोस्कोपशी जोडण्यात येतो आणि तो आवाजाची पातळी दर्शवतो. जर चेंडू बॅटशी किंचितशी कड घेऊन यष्टय़ांमागे गेला असेल तर स्लो-मोशन व्हिडीयोद्वारे चेंडू आणि बॅटचा अलगद स्पर्श झाला असेल तरी तो स्निकोमीटरमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून दर्शवला जातो. मैदानावरील पंचांना चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला आहे की नाही, याबाबत साशंकता असेल तर तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. चेंडू बॅटवर किंवा पॅडवर आदळला आहे की नाही तसेच बॅट जमिनीवर आदळली आहे का, याचाही माग या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काढला जातो.

हॉटस्पॉट : क्रिकेटमध्ये हॉटस्पॉट हे तंत्रज्ञान दाखल होईपर्यंत स्निकोमीटर ही पद्धत अचूक मानली जात नव्हती. ही एक इन्फ्रा-रेड इमॅजिंग पद्धत असून चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जाण्याआधी बॅटवर आदळला आहे की नाही, हे दर्शवते. चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला असेल तर गडद रंगाचा ठिपका इन्फ्रा-रेड इमेजद्वारे दिसतो. मैदानावरील पंचांच्या निर्णयक्षमतेत अचूकता आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. मेलबर्नस्थित बीबीजी स्पोर्ट्सने सर्वप्रथम क्रिकेटमध्ये या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. फ्रान्सचे शास्त्रज्ञ निकोलस बियाँ यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढले होते. अचूक निर्णय देण्यासाठी दोन इन्फ्रा-रेड कॅमेरे पुरेसे असले तरी संपूर्ण सामन्याचे चित्रीकरण करण्यासाठी चार इन्फ्रा-रेड कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. ही थर्मल व्हेव रिमोट सेन्सिंग पद्धत असून चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाल्यावर फ्रिक्शनद्वारे ऊर्जा उत्पन्न होते आणि इन्फ्रा-रेड इमेजिंग कॅमेरा पद्धतीमुळे बॅट आणि चेंडूचा स्पर्श झालेला भाग ठळकपणे दिसून येतो. बॅट आणि चेंडूचा अलगद स्पर्श झाला असेल तरीही तो इन्फ्रारेड इमेजद्वारे स्पष्ट दिसून येतो. २००६मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या अ‍ॅशेस मालिकेदरम्यान सर्वप्रथम हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.

हॉक-आय : ब्रिटनमधील डॉ. पॉल हॉकिन्स यांच्या या तंत्रज्ञानाचा वापर २००१मध्ये करण्यात आला. दूरचित्रवाणीवरील प्रक्षेपण परस्परसंवादी होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोलाचा वाटा आहे. सहा ते सात अधिक क्षमतावान कॅमेऱ्यांच्या मदतीने हे तंत्रज्ञान कार्य करते. गोलंदाजाने चेंडू टाकल्यावर तो कोणत्या दिशेने जात आहे, याचा माग काढण्यासाठी हे कॅमेरे स्टेडियमच्या छतावर बसवले जातात. या सहा कॅमेऱ्यांच्या साहाय्याने टिपला गेलेला व्हिडीयो एकत्र करून तो त्रिमिती पद्धतीने सादर केला जातो. हॉक-आय तंत्रज्ञानामुळे चेंडूने योग्य टप्पा आणि दिशा राखून यष्टय़ांचा वेध घेतला आहे की नाही, हे पाहिले जाते.

पिच व्हिजन : गोलंदाजांचा वेग, दिशा, टप्पा, उसळी आणि पायाची स्थिती मोजण्याचे तसेच त्याची नोंद ठेवण्यासाठीचे उत्तम तंत्रज्ञान म्हणजे पिच व्हिजन. एमआयस्प्रॉट या ब्रिटनस्थित कंपनीने क्रिकेटमध्ये प्रशिक्षणादरम्यान या पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली. या तंत्रज्ञानामुळे गोलंदाजाचा टप्पा आणि दिशा याचा नकाशा मिळण्यास मदत होते. फलंदाजांनाही योग्य दिशेने फटका लगावला आहे की नाही, कोणते चेंडू संकटात आणू शकतात, विविध गोलंदाजांविरुद्ध कामगिरीची तुलना करणे त्याचबरोबर फटक्यांचे ‘व्हॅगन-व्हील’ या सर्व गोष्टी समजू शकतात.

  स्पायडर-कॅम : मैदानाच्या कोणत्याही भागात जाऊन चित्रण करणारा कॅमेरा म्हणजे स्पायडरकॅम. मैदानाच्या चार दिशांना केव्हलर केबलद्वारे जोडला गेलेला तसेच डॉलीद्वारे वाहून नेणारा हा स्पायडर-कॅम मैदानातील घडामोडींचे अचूक चित्रण करतो. फायबर ऑप्टिक केबलसह एका सॉफ्टवेअरद्वारे हा कॅमेरा नियंत्रित केला जातो. इंडियन क्रिकेट लीगदरम्यान पहिल्यांदा स्पायडरकॅम वापरण्यात आला होता. त्यानंतर आता क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात स्पायडरकॅमचा वापर केला जात आहे.

स्टम्प कॅमेरा किंवा मायक्रोफोन : अगदी छोटा कॅमेरा स्टम्पच्या आत आणि मागच्या बाजूला मायक्रोफोन बसवण्यात येतो. फलंदाज त्रिफळाचीत झाल्यानंतरचा ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ टिपण्यास याची मदत होते. मायक्रोफोनचा उपयोग काही वेळेला संशयित झेल पकडल्यानंतर किंवा पायचीतचा निर्णय देताना होतो. यामुळे पंचांना अचूक निर्णय देण्यास मदत होते.

स्पीड गन : चेंडूचा वेग मापण्याचे अचूक साधन म्हणजे स्पीड गन. या तंत्रज्ञानामुळे गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा वेग मोजता येतो. १९९९मध्ये प्रथम या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. स्पीड गन एका खांबावर बसवण्यात येते. त्याद्वारे खेळपट्टीची लांबी मोजून गोलंदाजाचा वेग मोजण्यात येतो. या तंत्रज्ञानामुळे कोणता गोलंदाज किती वेगाने चेंडू टाकत आहे, हे ओळखता येते.

एलईडी बेल्स : क्रिकेटमध्ये बेल्सच्या रूपाने पहिल्यांदाच एलईडी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. बेल्सच्या आत मायक्रोप्रोसेसर आणि सेन्सर तसेच कमी क्षमतेची बॅटरी बसवण्यात येते. चेंडू स्टम्पवर आदळल्यानंतर शतांश सेकंदाच्या फरकाने बेल्समधील झगमगता प्रकाश सर्वाचे लक्ष वेधून घेतो. ऑस्ट्रेलियाच्या ब्राँटे इककेरमान यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान खूपच महागडे आहे. चेंडू यष्टय़ांवर आदळल्यानंतर तसेच यष्टीरक्षकाने यष्टय़ा उद्ध्वस्त केल्यावर बेल्समधील झगमगत्या प्रकाशामुळे फलंदाज बाद आहे किंवा नाही हे समजते.