गेले काही दिवस इंग्लंडमध्ये पावसाच्या हजेरीमुळे विश्वचषक सामन्यांचा रसभंग होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे साऊदम्प्टनमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामन्याला अखेर सुरु झाला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ख्रिस गेलने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत झटपट ३६ धावा ठोकल्या. या खेळीत ख्रिस गेलने विंडीजचे अनोखा विक्रम करत माजी विंडीज खेळाडू सर व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

इंग्लंडविरुद्ध सामन्यात फलंदाजीदरम्यान २४ वी धाव घेत गेलने इंग्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांत अव्वल स्थान पटकावलं आहे. ख्रिस गेलने रिचर्ड्स यांचा १६१९ धावांचा विक्रम मोडला. रिचर्ड्स यांनी ३४ डावांत ५७.८२ च्या सरासरीनं ३ शतकं व ११ अर्धशतकांच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. नाबाद १८९ ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे.

दरम्यान ३६ धावांच्या खेळीत ख्रिस गेलने ५ चौकार आणि एक षटकार लगावला. लियाम प्लंकेटने जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करत त्याला माघारी धाडलं.