ख्रिस्तियानो रोनाल्डो युव्हेंटसने सेरी-ए लीग फुटबॉलमध्ये कॅगलियारीवर मिळवलेल्या २-० विजयाचा शिल्पकार ठरला.

या विजयानंतरही युव्हेंटसला आठ सामन्यांतून १६ गुणांसह दुसऱ्या स्थानीच समाधान मानावे लागले आहे. एसी मिलान ७ सामन्यांतून १७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. दमदार बहरात असणाऱ्या रोनाल्डोचे गेल्या पाच सामन्यांत आठ गोल झाले आहेत. रोनाल्डोने ३८ व्या आणि ४२ व्या असे चार मिनिटांच्या अंतरात झटपट दोन गोल केले.

अन्य लढतीत लॅझियोनो सिरो इमोबाईलच्या गोलच्या जोरावर क्रोटोनेवर २-० असा विजय मिळवला. इमोबाईलने नुकतेच करोना संसर्गातून बरे होत यशस्वी पुनरागमन केले. याआधीच्या तीन लढतींतही इमोबाईलने गोलांची नोंद केली होती. अन्य लढतीत अटलांटाला मात्र स्पेझियाकडून गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली. या लढतींअखेर लॅझियो आणि अटलांटा यांचे प्रत्येकी १४ गुण आहेत.

मेसी अपयशी; बार्सिलोनाचा पराभव

रोनाल्डोने प्रभाव पाडला असला तरी ला-लिगा फुटबॉलमध्ये सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेसी बार्सिलोनाकडून गोल करण्यात अपयशी ठरला. परिणामी अ‍ॅटलेटिको माद्रिदने बार्सिलोनावर २०१०नंतर प्रथमच या स्पर्धेत १-० असा विजय मिळवला. यानिक कॅरास्कोने केलेला गोल त्यांच्या विजयात मोलाचा ठरला. अ‍ॅटलेटिको २० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.