युव्हेंटस, चेल्सी यांचेही दमदार विजय

तुरिन

ख्रिस्तियानो रोनाल्डोने कारकीर्दीतील ७५०वा गोल केल्यामुळे युव्हेंटसने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये डायनॅमो किव्ह संघाचा ३-० असा पाडाव केला. या विजयामुळे युव्हेंटसने गटात अग्रस्थान पटकावण्याच्या दिशेने कूच केली आहे. लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाने फेरेंकवारोस आणि चेल्सीने सेव्हियाचा धुव्वा उडवला.

युव्हेंटससाठी दुसरा गोल झळकावत रोनाल्डोने कारकीर्दीतील ७५०वा गोल लगावण्याची किमया साधली. फेडेरिको चिएसा आणि अल्वारो मोराटा यांच्या गोलमुळे युव्हेंटसने डायनानो कियिव्हचे आव्हान सहजपणे परतवून लावले. या विजयानंतरही युव्हेंटस ‘ग’ गटात दुसऱ्या स्थानी आहे. बार्सिलोनाने त्यांना तीन गुणांच्या फरकाने मागे टाकत अग्रस्थान काबीज केले आहे.

बार्सिलोनाचा विजय

अँटोनी ग्रिझमनने सलग तिसऱ्या सामन्यात गोल लगावल्यामुळे बार्सिलोनाने हंगेरीतील विजेत्या फेरेंकवारोस संघावर ३-० अशी मात केली. बार्सिलोनाने चार सामन्यांत चार विजय मिळवल्याने त्यांनी अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवले आहे. या लढतीसाठी  लिओनेल मेसी, फिलिपे कुटिन्हो आणि मार्क आंद्रे-टेर स्टेगन या अव्वल खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.

मेसीला दंड

महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी लिओनेल मेसीने परिधान केलेली आपली जर्सी काढल्यामुळे त्याला ६०० युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारी झालेल्या स्पॅनिश लीग फुटबॉलमधील ओसासुना संघाविरुद्धच्या लढतीत हे कृत्य केल्याप्रकरणी स्पर्धा समितीने मेसीला हा दंड सुनावला.