लिओनेल मेसीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाने फ्रेंकी डे जाँगच्या दमदार कामगिरीमुळे ला लिगा फुटबॉलमध्ये एल्चे संघावर २-० अशी मात करत या विजयासह बार्सिलोनाने ३७ गुणांसह तिसरे स्थान कायम राखले आहे.

प्रतिस्पर्ध्याला धडक दिल्याप्रकरणी बंदी घातलेला मेसी सलग दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. मात्र डे जाँगने ३९व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाला आघाडीवर आणले. त्यानंतर त्याच्याच गोलसाहाय्यामुळे रिकी पुइग याने ८९व्या मिनिटाला गोल लगावत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.

अन्य सामन्यांत, अ‍ॅटलेटिको माद्रिदने व्हॅलेंसियाचा ३-१ असा पाडाव करत विजयी घोडदौड कायम राखली आहे. या विजयानिशी अ‍ॅटलेटिकोने ४७ गुणांसह आपले अग्रस्थान भक्कम केले. जोआओ फेलिक्स, लुइस सुआरेझ आणि अँजेल कोरिया यांनी विजयी संघासाठी गोल केले.

बायर्नचे अग्रस्थान भक्कम

बायर्न म्युनिकने शाल्के संघाचा ४-० असा धुव्वा उडवत बुंडेसलीगा फुटबॉलमधील सलग आठव्या विजयाची नोंद केली. त्यामुळे बायर्न म्युनिकने ४२ गुणांसह आपले अग्रस्थान भक्कम केले.