22 July 2018

News Flash

काशीचा राजधानीत दबदबा

‘‘काशी, मेराझ शेख आणि सेल्व्हामणी यांचा खेळ आता उंचावत आहे.

 

दिल्लीपुढे बंगालची शरणागती; तेलुगू टायटन्स उपान्त्य फेरीत

‘काशी’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या दबंग दिल्लीच्या काशिलिंग आडकेचा राजधानीत दबदबा दिसून आला. त्याच्या चौफेर चढायांपुढे महाराष्ट्राच्याच खेळाडूंचा भरणा असलेल्या बंगाल वॉरियर्सने अक्षरश: शरणागती पत्करली. त्यामुळे दिल्लीने ४१-२० अशा दमदार विजयासह प्रो कबड्डी लीगमधील आपले आव्हान जिवंत राखले आहे. याचप्रमाणे तेलुगू टायटन्सने राहुल चौधरीच्या दिमाखदार खेळाच्या बळावर जयपूर पिंक पँथर्सचा ३५-२३ असा पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली.

नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवरील पहिल्याच सामन्यात दिल्लीने प्रारंभीपासूनच आपले नियंत्रण मिळवत १०व्या आणि १९व्या मिनिटाला असे दोन लोण चढवले. त्यामुळे मध्यंतराला दिल्लीला २१-१० अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या सत्रात दिल्लीने ३०व्या मिनिटाला तिसरा लोण चढवला. यंदाच्या हंगामात प्रथमच सूर गवसलेल्या काशीलिंगने हुकमी चढाया करीत (१३ गुण) बंगालचे क्षेत्ररक्षण खिळखिळे केले. सेल्व्हामणी के. याने (७ गुण) चढायांमध्ये त्याला सुरेख साथ दिली. बंगालकडून मोनू गोयतने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.

‘‘काशी, मेराझ शेख आणि सेल्व्हामणी यांचा खेळ आता उंचावत आहे. घरच्या मैदानावर उपान्त्य फेरी आम्ही नक्की गाठू,’’ असा विश्वास दिल्लीचे प्रशिक्षक सागर बांदेकर यांनी व्यक्त केला.

आजचे सामने

दबंग दिल्ली वि. पाटणा पायरेट्स

आइस दिवास वि. फायर बर्ड्स

 सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.

First Published on July 25, 2016 3:52 am

Web Title: delhi dabang win against bengal warriors