दिल्ली डायनामोज क्लबच्या खेळाडूंचा ‘मास्क’ घालून सराव; जमशेदपूरविरुद्ध आज सामना

नवी दिल्लीतील वायुप्रदूषणामुळे श्रीलंका क्रिकेट संघातील खेळाडूंना तोंडावर मास्क घालावे लागले आणि समाजमाध्यमांवर सामन्यापेक्षा त्याचीच चर्चा रंगली. मंगळवारी राजधानीतील जवाहरलाल नेहरू  स्टेडियमच्या मैदानावर आणखी काही खेळाडू तोंडावर मास्क लावून सराव करताना पाहायला मिळाले. इंडियन सुपर लीग फुटबॉलमधील दिल्ली डायनामोज क्लबचे फुटबॉलपटू दिल्लीच्या प्रदूषणातून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क घालूनच मैदानावर उतरले.

दिल्ली डायनामोज आणि जमशेदपूर एफसी यांच्यात बुधवारी सामना होणार आहे. डायनामोजचे प्रशिक्षक मिग्यूएल एंजल पोर्तुगाल यांनी खेळाडूंनी सरावादरम्यान मास्क घातले असले तरी प्रत्यक्ष सामन्यात हे चित्र पाहायला मिळणार नसल्याचे सांगितले. ‘येथील प्रदूषणाची समस्या गंभीर आहे, परंतु त्याचा परिणाम केवळ माझ्यावर किंवा खेळाडूंवरच होणार नाही. दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्रास होत आहे. आम्ही मास्क घालून सराव केला. मात्र, बुधवारी सामन्यात खेळाडू तसे करणार नाहीत,’ असे पोर्तुगाल यांनी सांगितले.

‘या लीगमधील सामने होम व अवे अशा पद्धतीने खेळवले जात आहेत आणि उद्या आम्ही घरच्या मैदानावर खेळणार आहोत. त्यामुळे त्यात न खेळण्याचा प्रश्नच येत नाही, आम्हाला खेळायलाच हवे. पण खेळाडू प्रत्यक्ष लढतीत मास्क घालून खेळले, तर त्यावर माझा आक्षेप असणार नाही,’ असे पोर्तुगाल यांनी स्पष्ट केले.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी येथे पार पडलेल्या दिल्ली अर्ध मॅरेथान स्पध्रेवरही प्रदूषणाचे सावट होते. ही स्पर्धा रद्द करण्यात यावी अशी मागणी तेथील स्वयंसेवी संस्थांनी  केली होती.

या कालावधीत दिल्लीत सामने घेणेच अयोग्य – कोपेल

वर्षांतील या कालावधीत दिल्लीत प्रचंड प्रदूषण असते आणि त्यामुळे येथे सामन्यांचे आयोजन करणेच चुकीचे आहे. हा खेळाडूंच्या जिवाशी खेळ चालला आहे, असे ठाम मत जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक स्टीव्ह कोपेल यांनी व्यक्त केले. ‘मी गेल्या वर्षी केरळ ब्लास्टर्स क्लबसोबत दिवाळीच्या दरम्यान येथे आलो होतो. तेव्हाही प्रदूषणाची हीच समस्या होती. गेल्या तीन वर्षांपासून या समस्येवर तोडगा काढला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही. या कालावधीत दिल्लीत सामने आयोजित करू नये, असे मी गेल्या वर्षीही सांगितले होते,’ असे कोपेल म्हणाले.