बॉक्सिंगमध्ये चांगली कामगिरी करून भारताचे नाव उंचावणाऱ्या एका बॉक्सरवर कुल्फी विकण्याची वेळ आली आहे. आपल्या बॉक्सिंगच्या करिअरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत १७ सुवर्ण पदकं, एक रजत पदक आणि पाच कांस्य पदकं अशी २३ पदकांची कमाई करणाऱ्या बॉक्सरवर आता कुल्फी विकण्याची वेळ आली आहे. दिनेश कुमार असं या बॉक्सरचं नाव असून तो हरयाणाचा आहे. त्याला अर्जुन अवॉर्ड देऊनही सन्मानित करण्यात आलं आहे. वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज फिटावं आणि आपला उदरनिर्वाह चालावा म्हणून दिनेश कुमारला कुल्फी विकावी लागते आहे.

३० वर्षांचा दिनेश कुमार काही वर्षांपूर्वी एका अपघातात जायबंदी झाला. या अपघाताने दिनेशचं बॉक्सिंग करिअरच संपवून टाकलं. कारण दिनेशवर उपचार करण्यासाठी त्याच्या वडिलांना कर्ज घ्यावं लागलं. या कर्जाआधी दिनेशच्या वडिलांनी दिनेशच्या बॉक्सिंग ट्रेनिंगसाठीही कर्ज काढलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिनेशला एक बॉक्सर म्हणून लौकिक मिळावा अशी दिनेशच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांची ही इच्छा दिनेशने पूर्णही केली मात्र काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताने त्याचं बॉक्सिंगचं करिअर संपुष्टात आलं.

दिनेशच्या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढला. दिनेशने सरकारकडे मदतीसाठी याचना केली, आपल्याला सरकारी नोकरी मिळावी म्हणून अर्जही केले मात्र या कशाचाही उपयोग झाला नाही. हरयणाच्या आत्ताच्या आणि आधीच्या सरकारने त्याला कोणतीही मदत केली नाही. कोणतीही मदत न मिळाल्याने दिनेश कुमारला त्याच्या वडिलांसोबत कुल्फी विकावी लागते आहे. कोच म्हणून आपल्याला सरकारने नोकरी द्यावी अशी त्याची मागणी आहे. आपण ज्याप्रकारे बॉक्सिंग करायचो तसेच बॉक्सर घडवणं हे दिनेशचं स्वप्न आहे

मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग केलं आहे. मला एकूण २३ पदकं मिळाली आहेत. मात्र एका अपघातानंतर सगळंच संपलं. माझ्या वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आता मला कुल्फी विकावी लागते आहे. सरकारने मला कर्जाचा हा बोजा उतरवण्यासाठी मदत करावी अशी विनंती मी करतो असेही दिनेशने म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.