मनू १२व्या तर यशस्विनी १३व्या स्थानी; दीपक आणि दिव्यांश अंतिम फे री गाठण्यात अपयशी

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी मिराबाई चानूने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकल्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी मात्र भारताला पदक जिंकण्यात अपयश आले. हमखास पदकांची खात्री असलेल्या नेमबाजांनी सलग दुसऱ्या दिवशी निराशा केली. पिस्तूल बिघडल्याचा फटका मनू भाकरला बसला. परंतु बॉक्सिंगमध्ये एमसी मेरी कोम, बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू आणि टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने शानदार कामगिरी करून भारताला दिलासा दिला. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी पुरुषांच्या नौकानयन स्पध्रेत उपांत्य फेरी गाठून पदकाच्या आशा उंचावल्या. परंतु भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करला.

पीटीआय, टोक्यो

भारताचे पदकाचे आशास्थान असलेल्या नेमबाजांनी ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी निराशाजनक कामगिरीची नोंद केली. युवा नेमबाज मनू भाकर हिच्या पिस्तुलात बिघाड झाल्यामुळे तिला पात्रता फेरीचाही अडथळा पार करता आला नाही.

ऑलिम्पिकमध्ये देशाचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणाऱ्या १९ वर्षीय मनूला महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात १२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पिस्तूल दुरुस्त करण्यासाठी तब्बल २० मिनिटांचा वेळ वाया घालवल्यामुळे मनूला दडपणाखाली कमी वेळेत ५७५ गुणांपर्यंतच मजल मारता आली. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या यशस्विनी सिंह देस्वालने खराब सुरुवातीनंतर चांगली कामगिरी करत ५७४ गुण मिळवले. मात्र तिची १३व्या क्रमांकावर घसरण झाली.

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अनुभवी दीपक कुमार आणि युवा दिव्यांश सिंह पनवार यांनी सुमार कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यांना अनुक्रमे २६व्या आणि ३२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दीपकने सहा मालिकांच्या पात्रता फेरीत ६२४.७ तर दिव्यांशने ६२२.८ गुण मिळवले. ही कामगिरी अंतिम फेरीसाठी पुरेशी ठरली नाही.

सौरभ चौधरी आणि मनूच्या निराशाजनक कामगिरीमुळे आता रायफल नेमबाजांकडून पदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. दीपक, दिव्यांश तसेच अपूर्वी चंडेला व इलाव्हेनिल वालारिवान यांनी महिलांच्या १० मीटर पात्रता फेरीत खराब कामगिरी केली. मात्र अद्याप १२ प्रकारांमध्ये भारतीय नेमबाज सहभागी होणार असल्याने त्यांच्याकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे.

अंगदला अंतिम फेरीची संधी

भारताच्या अंगद वीर बाजवा याची दोन वेळा लक्ष्यवेध करण्याची संधी हुकल्यामुळे त्याला पुरुषांच्या स्किट प्रकाराच्या पात्रता फेरीत ११व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र तरीही अंतिम फेरीसाठीच्या सहा जणांमध्ये स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. बाजवाने पहिल्या तीन मालिकांमध्ये २५, २४ आणि २४ गुणांची कमाई केली.  मायराज अहमद खान या भारताच्या नेमबाजाने ७१ गुण मिळवत ३० नेमबाजांमधून २५वे स्थान मिळवले.

पिस्तूलमधील बिघाडामुळे मनूची अंतिम फेरी हुकली

महत्त्वाच्या क्षणी पिस्तूलमध्ये बिघाड होणे, हे नेमबाजांसाठी काही नवे नाही. परंतु ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याचा फटका रविवारी भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिला बसला. पात्रता फेरीत तब्बल २० मिनिटे वाया गेल्यामुळे मनूला महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

पिस्तूलमधील कॉकिंग लिव्हर तुटल्यामुळे मनूला ५५ मिनिटांत ४४ वेळा लक्ष्यवेध करायचा होता. मात्र तांत्रिक बाबींवर मात करून नेमबाजी केंद्रावर पतरल्यानंतर मनूसमोर ३६ मिनिटांत ४४ लक्ष्यवेध करण्याचे उद्दिष्ट होते. कारण दुरुस्त केलेली पिस्तूल नीट सुरू आहे की नाही, हे बघण्यासाठी मनूला ४-५ मिनिटे सरावात घालवावी लागली.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मनूने पहिल्या टप्प्यात ९८ गुण मिळवत चांगली सुरुवात केली. त्यानंतर ९५, ९४ आणि ९५ गुण मिळवल्यानंतर मनूने पाचव्या टप्प्यात ९८ गुण प्राप्त केले. सहाव्या आणि अंतिम टप्प्यात एकदा आठ आणि तीनदा नऊ गुण मिळवल्यामुळे मनू १२व्या क्रमांकावर फेकली गेली. फ्रान्सच्या सेलिन गॉबरविले हिने पात्रता फेरीत आठवे आणि अखेरचे स्थान प्राप्त केले.  याआधी २०१९च्या विश्वचषक स्पर्धेतही मनूला अशाच प्रकारच्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेत ऑलिम्पिकचे स्थान मिळवण्यात मनू अपयशी ठरली होती. पण पुढील विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत मनूने ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले होते.

साधारणपणे काही मिनिटांतच पिस्तुलातील बिघाड दुरुस्त करता येतो. आम्हीही फार कमी वेळ घेतला. पण बराचसा वेळ वाया गेल्याने मी मनूला थेट लक्ष्यवेध करण्यास सांगितले. पिस्तूल दुरुस्त केल्यानंतर ३६ मिनिटांत ४४ वेळा लक्ष्यवेध करायचा असल्याने मनूसमोर खडतर आव्हान होते. खरे सांगायचे झाले तर ही दुर्दैवी घटना ऑलिम्पिकमध्येच मनूच्या वाटय़ाला आली.

– रोनक पंडित, भारताचे पिस्तूल प्रशिक्षक

मेरी उपउपांत्यपूर्व फेरीत

टोक्यो : सहा वेळा विश्वविजेत्या एमसी मेरी कोमने (५१ किलो) ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पध्रेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळवले. रविवारी मेरीने सलामीच्या लढतीत डॉनिनिकन प्रजासत्ताकच्या मिग्वेलिना हर्नाडीझ गार्सियावर कौशल्यपूर्ण विजय मिळवला.

२०१२मध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक आणि अनेक आशियाई जेतेपदे खात्यावर असणाऱ्या ३८ वर्षीय मेरीने वयाने १५ वर्षांनी लहान असलेल्या मिग्वेलिनचा ४-१ असा पराभव केला. मणिपूरच्या मेरीने सुरुवातीपासूनच रिंगणात वर्चस्व मिळवत कुशल रणनीतीनुसार खेळ करीत हा सामनाजिंकला. मेरी पुढील फेरीत कोलंबियाच्या इन्ग्रिट व्हॅलेन्सियाचा सामना करणार आहे. आतापर्यंत दोनदा झालेल्या सामन्यात मेरीने तिला हरवले आहे.

माझ्याकडे सर्व पदके आहेत; परंतु ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याच्या ईर्षेनेच मी यंदा सहभागी झाले आहे. – मेरी कोम

मनीषचा पराभव

सलामीच्या लढतीत रोमहर्षक लढत देऊनही मनीष कौशिकचे (६३ किलो) ऑलिम्पिक पदार्पण निराशाजनक ठरले. मनीषने ब्रिटनच्या ल्युक मॅककॉर्माककडून १-४ अशा पद्धतीने हार पत्करली.

मनिकाची लक्षवेधी आगेकूच

टोक्यो : भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत जागतिक क्रमवारीत ३२व्या क्रमांकाच्या मार्गारायटा पेसोत्स्काला नमवून महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ६२व्या क्रमांकावर असलेल्या मनिकाने पहिले दोन गेम गमावल्यानंतर आश्चर्यकारक पुनरागमन करीत सामना ४-११, ४-११, ११-७, १२-१०, ८-११, ११-५, ११-७ अशा फरकाने ५७ मिनिटांमध्ये जिंकला. उपउपांत्यपूर्व फेरीत मनिकाची ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कानोव्हाशी गाठ पडणार आहे. कारकीर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी झालेल्या मनिकाकडून आणखी एका धक्कादायक कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे.

साथियनचे आव्हान संपुष्टात

जागतिक क्रमवारीत ३८व्या क्रमांकावर असलेल्या जी. साथियनला ऑलिम्पिक पदार्पणात चुणूक दाखवता आली नाही. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या साथियनला दुसऱ्या फेरीत दडपण हाताळण्यात अपयश आले. जागतिक क्रमवारीत ९४व्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या सिऊ हँग लॅमकडून ३-४ अशा फरकाने हार पत्करली. या सामन्यात साथियनने सुरुवातीला ३-१ अशी आघाडी घेतली होती.

सिंधूचा विजयारंभ

टोक्यो : विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने आपल्या ऑलिम्पिक अभियानाला रविवारी विजयारंभ केला. महिला एकेरी बॅडमिंटन स्पध्रेतील ज-गटात सिंधूने इस्रायलच्या सेनिया पॉलिकार्पोव्हाचा सरळ गेममध्ये पराभव केला.

२६ वर्षीय सिंधूने जागतिक क्रमवारीत ५८व्या क्रमांकावर असलेल्या सेनियाचा पहिल्या लढतीत २१-७, २१-१० असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूची पुढील लढत ३४व्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या झँग यॅन यि हिच्याविरुद्ध आहे.

सिंधूने आक्रमक सुरुवात केली; परंतु ती ३-४ अशी पिछाडीवर पडली. पण तिने त्वरित सामन्यावर नियंत्रण मिळवले. सेनियाकडूनही काही चुका झाल्यामुळे पहिल्या विश्रांतीप्रसंगी सिंधू ११-५ अशी आघाडीवर होती. मग सिंधूने सरळ आणि क्रॉस कोर्ट स्मॅशेसचा खुबीने वापर करीत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सेनिया गुणांसाठी झगडताना आढळली. त्यामुळे सिंधूने ९-३ अशी आघाडी घेत नंतर आत्मविश्वासाने दुसऱ्या गेमसह सामना जिंकला.

पहिला सामना आरामात जिंकेन याची खात्री होती, परंतु तरीही मी या सामन्याकडे गांभीर्याने पाहिले. – पी. व्ही. सिंधू