News Flash

ऑनलाइन बुद्धिबळात फसवणूक करणे सोपे!

ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे मत

(संग्रहित छायाचित्र)

तुषार वैती

बुद्धिबळ या खेळाला फसवणुकीचे प्रकार काही नवे नाहीत. संगणक क्रांतीनंतर त्यात झपाट्याने वाढ होत आहे. आता करोनाच्या काळात बऱ्याचशा स्पर्धा ऑनलाइन खेळवल्या जात असल्याने त्यात फसवणूक करणे खूप सोपे आहे, असे मत महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वी दादांग सुबूर नावाच्या परदेशी खेळाडूने इंजिन किंवा चेस स्ट्रिमरच्या माध्यमाने इंडोनेशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर आयरिन सुकंदर याला पराभूत केले. त्याचबरोबर पोलंडची एक अव्वल खेळाडूने चेस इंजिनची मदत घेतली होती. या दोघांच्या चोऱ्या पकडल्या गेल्यानंतर बुद्धिबळातील फसवणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

‘‘अपेक्षेपेक्षा जास्त पदरात पाडून घेण्याच्या मानवी स्वभावामुळेच अन्य क्षेत्रांप्रमाणेच बुद्धिबळासारख्या खेळातही सहजपणे फसवणूक केली जात आहे. पूर्वीपासूनच बुद्धिबळात फसवणूक होत होती. पूर्वी सामना सुरू असताना आपल्या पटावरील स्थितीनुसार दुसऱ्या खेळाडूला चाली विचारल्या जात, पूर्व युरोपियन देशांमध्ये प्रशिक्षक माना डोलावून आपल्या शिष्यांना चाली सांगत किंवा शौचालयांमध्ये बुद्धिबळाची पुस्तके लपवली जायची. भारतात राष्ट्रीय स्पर्धांमध्येही फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आंतरराष्ट्रीय मास्टर किंवा ग्रँडमास्टर किताबाचे टप्पे पूर्ण करण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूला लाच देण्याचे प्रकारही समोर आले आहेत,’’ अशी अनेक उदाहरणे ठिपसे यांनी दिली.

‘‘संगणक क्रांतीमुळे समूहाने फसवणूक करण्याचे प्रकार थांबले आणि एकट्याने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले. संगणकावरील मोफत सॉफ्टवेअरद्वारे तसेच मानवी बुद्धीपेक्षा अफाट वेग असलेले मशीन इंजिन विकत घेऊन त्याद्वारेही ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. हल्लीचे पालक आपले अतृप्त स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांवर दबाव आणतात. अशातच झटपट यश मिळवण्यासाठी मुलांकडून पालक आणि प्रशिक्षकांच्या मदतीने चुकीचा मार्ग निवडला जात आहे,’’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या नवीन नियमांविषयी ठिपसे म्हणाले की, ‘‘फिडेने काही नवे नियम आणले असून ऑनलाइन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या बुद्धिबळपटूने आपल्या खोलीत दोन कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे. एका कॅमेऱ्यातून खेळाडू आणि संगणकाची स्थिती स्पष्ट दिसायला हवी आणि खोलीत अन्य कुणाचाही वावर नसावा. सामना संपेपर्यंत बुद्धिबळपटूवर जागेवरून उठू शकत नाही. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. पण तरीही फसवणुकीचे प्रकार शून्यावर आले असे म्हणणे योग्य ठरणार नाही.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:11 am

Web Title: easy to cheat in online chess grandmaster praveen thipse abn 97
Next Stories
1 भारताची अर्जेंटिनाशी बरोबरी
2 भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षक
3 शाहिद आफ्रिदी भडकला, IPL साठी मालिका अर्धवट सोडण्याची परवानगी दिल्याने आफ्रिका बोर्डावर संतापला
Just Now!
X