तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत त्यांनी १३६ धावांत ६ गडी गमावले. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला. पण अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर बंद करावा लागला. या सहा बळींपैकी जेरमाइन ब्लॅकवूड याची विकेट महत्त्वाची ठरली.

पहिल्या सामन्यात ब्लॅकवूडने दमदार ९५ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीमुळेच एका दिवसात २०० धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने पार केले होते. तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीदेखील ब्लॅकवूडला चांगली सुरूवात मिळाली होती. पण ख्रिस वोक्सने अप्रतिम चेंडू टाकत त्याला त्रिफळाचीत केले. ब्लॅकवूड खेळत असताना गुड लेन्थ चेंडू टप्पा पडून थोडा स्विंग झाला. ब्लॅकवूडला चेंडू नीट खेळता आला नाही. काही समजण्याआधीच चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून गेला अन मधला स्टंप उडाला.

पाहा व्हिडीओ –

त्याआधी इंग्लंडच्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. क्रेग ब्रेथवेट १ धाव काढून बाद झाला. कॅम्पबेल आणि होप यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कॅम्पबेल ३२ तर होप १७ धावांवर माघारी परतले. ब्रुक्स आणि चेसदेखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. ब्लॅकवूडने बाद झाल्यावर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबेपर्यंत कर्णधार जेसन होल्डर आणि डावरिच यांनी खेळपट्टीवर तग धरला.