मँचेस्टर : रॉरी बर्न्‍स आणि जो रूट यांच्या झुंजार अर्धशतकांसह साकारलेल्या भागीदारीनंतर उत्तरार्धात इंग्लंडला जोश हॅझलवूडने हादरे दिले. त्यामुळे अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा निम्मा संघ २०० धावांत तंबूत परतला असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

इंग्लंडने एक बाद २३ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु हॅझलवूडने ख्रिस ओव्हरटनला (५) दुसऱ्या षटकात बाद करण्यात यश मिळवले. त्यामुळे इंग्लंडची २ बाद २५ अशी अवस्था झाली. परंतु सलामीवीर बर्न्‍स आणि रूट यांनी तिसऱ्या गडय़ासाठी १४१ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत राखले. मिचेल स्टार्कला चौकार खेचून बर्न्‍सने अर्धशतक झळकावले. परंतु हॅझलवूडने बर्न्‍सला बाद करीत ही जोडी फोडली. बर्न्‍सने नऊ चौकारांसह ८१ धावा केल्या. मग पुढच्याच षटकात हॅझलवूडने रूटचा (७१) अडसरही दूर केला. हॅझलवूडने जेसन रॉयचा त्रिफळा उडवत ४८ धावांत ४ बळी घेण्याची किमया साधली.

गुरुवारी स्टीव्ह स्मिथच्या २११ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ८ बाद ४९७ धावसंख्येवर घोषित केला. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे पहिले सत्र वाया गेले.

संक्षिप्त धावफलक

*  ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ८ बाद ४९७ डाव घोषित

* इंग्लंड (पहिला डाव) : ७४ षटकांत ५ बाद २०० (रॉरी बर्न्‍स ८१, जो रूट ७१; जोश हॅझलवूड ४/४८)