इथिओपियाच्या बेलाचेवु एदांले याने धावण्याचे सुरेख कौशल्य दाखवत पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीत मुख्य गटाचे अजिंक्यपद मिळविले. त्याचेच सहकारी हाबतामु वेगी याने पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीचे विजेतेपद मिळविले तर अबेरू त्सेमा हिने महिलांची अर्धमॅरेथॉन शर्यत जिंकून इथिओपियाचे वर्चस्व सिद्ध केले. ही शर्यत पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टने आयोजित केली होती.
बेलाचेवु या २६ वर्षीय खेळाडूने ४२.१९५ किलोमीटरचे अंतर दोन तास १७ मिनिटे ५२ सेकंदांत पार केले. केनियाच्या एझेकिएल चेरोप याने ही शर्यत २ तास १८ मिनिटे १६ सेकंदांत पूर्ण करीत उपविजेतेपद मिळविले तर बेलाचेवुचा सहकारी एदिसा एजिजु याने ही शर्यत तिसऱ्या क्रमांकाने पूर्ण करताना २ तास २० मिनिटे १६ सेकंद वेळ नोंदविली. अर्धमॅरेथॉन शर्यत वेगी याने एक तास ४ मिनिटे २१ सेकंद वेळेत जिंकली. केनियाच्या येगोन चेरुयोट याने उपविजेतेपद मिळविले तर इथिओपियाच्या मेलाकु बिझुनेह याला तिसरे स्थान मिळाले. महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत अबेरू त्सेमा (एक तास १६ मिनिटे ५४ सेकंद), मेस्तावोत शानकुटी (एक तास १७ मिनिटे १५ सेकंद) व रोमेहा अलेनी वोल्दु (एक तास १७ मिनिटे १७ सेकंद) या इथिओपियाच्याच खेळाडूंनी पहिले तीन क्रमांक मिळवित निर्विवाद वर्चस्व गाजविले.
खंडोजीबाबा चौकात रविवारी सकाळी ६.४५ वाजता या शर्यतीस प्रारंभ झाला. मुख्य मॅरेथॉनमध्ये जेमतेम पन्नासच खेळाडू सहभागी झाले होते. मोकळा रस्ता, थंड हवामान याचा फायदा घेत इथिओपिया व केनियाच्या खेळाडूंचा समावेश असलेला १५ ते २० खेळाडूंचा जथ्था त्या वेळी आघाडीवर होता. अतिशय पल्लेदार धावत या खेळाडूंनी पहिले चौदा किलोमीटर अंतर ४६ मिनिटे ३९ सेकंदांत पार केले होते. १८ व्या किलोमीटरला बेलाचेवु, एसायस अमातो, एदिसा, एझिकेल तारुस या खेळाडूंनी अन्य खेळाडूंपेक्षा १०० मीटर आघाडी घेतली होती. २८ व्या किलोमीटरलाही तेच खेळाडू आघाडीवर होते. ३१ व्या किलोमीटरला बेलाचेवु याने थोडासा वेग वाढविला. त्याने ३२ किलोमीटरचे अंतर एक तास ४४ मिनिटांत पार केले होते.
वाहतुकीच्या कोंडीमुळे गोंधळ!
बोपोडी ते स्पायसर या टप्प्यात भरपूर पोलीस बंदोबस्त असूनही वाहतुकीची कोंडी झाली होती. मुख्य शर्यत २१ किलोमीटरला येण्यापूर्वीच तेथून अर्धमॅरेथॉन शर्यतीस प्रारंभ करण्यात आला होता. त्यामुळे या शर्यतीमधील खेळाडू पुढे गेल्यानंतर शर्यत संपली असावी असाच समज पोलिसांचा झाला. या गोंधळात बेलाचेवुच्या पाठोपाठ असलेले चेरोप व एदिसा हे वाहतुकीच्या कोंडीत अडकले.
बेलाचेवु याने ३५ व्या किलोमीटरनंतर वेग आणखीनच वाढविला. त्याने चेरोप याच्यापेक्षा जवळ जवळ एक किलोमीटरची आघाडी घेतली होती. आपले विजेतेपद निश्चित झाल्यानंतर त्याने वेगात सातत्य ठेवीत नेहरू स्टेडियमवरील अंतिम रेषा पूर्ण केली.
विजेतेपदाची खात्री होती!
या शर्यतीत दोन वर्षांपूर्वी मी भाग घेतला होता. त्या वेळी मला नववे स्थान मिळाले होते. त्या अनुभवाचा फायदा घेत यंदा विजेतेपद मिळविण्याची मला खात्री होती. जर वाहतुकीचा त्रास नसता झाला, तर कदाचित ही शर्यत मी दोन तास दहा मिनिटांपेक्षा कमी वेळेत जिंकली असती असे बेलाचेवु याने सांगितले. तो व्यावसायिक मॅरेथॉनपटू असून २ तास १६ मिनिटे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दररोज तो रस्ता, वाळू व ट्रॅकवर पाच ते सहा तास सराव करतो.
शर्यतीचा प्रारंभ व पारितोषिक वितरण राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ऑलिम्पिक नेमबाज अंजली भागवत-वेदपाठक यांच्या हस्ते झाला.
 अन्य निकाल-
१० किलोमीटर-पुरुष-१. मानसिंग (३१ मिनिटे १२ सेकंद), २. अर्जुन प्रधान, ३. अंकित मलिक (सर्व आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट). महिला-१. नीलम रजपूत (नवी मुंबई, ३७ मिनिटे २४ सेकंद), २. कविता राऊत (नाशिक), ३. ललिता बाबर (पुणे)
क्षणचित्रे
* खडकी बाजारापाशी मॅरेथॉनपटू धावत असताना अचानक रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गाईलाही धावण्याची स्फूर्ती मिळाली. तिने या खेळाडूंबरोबर ५० मीटर अंतर धाव घेतली. परदेशी खेळाडूंची त्या वेळी बोबडीच वळली होती.
* ढिसाळ नियोजनामुळे शर्यतीच्या वेळी गोंधळ दिसून आला. पुरेसे प्रायोजकांच्या अभावी यंदा प्रत्येक किलोमीटरला कमान उभारण्यात आली नव्हती. त्याऐवजी हातात किलोमीटरचा फलक घेतलेले स्वयंसेवक ठेवण्यात आले होते. त्यापैकी अनेक स्वयंसेवक एखाद्या कोपऱ्यात उभे होते किंवा अन्य मित्रांसमवेत गप्पा गोष्टी करीत होते. त्यामुळे अनेक खेळाडूंना हे फलक कळलेच नाहीत.
* सर्वसाधारणपणे प्रसारमाध्यमांना शर्यतीत सहभागी झालेल्या खेळाडूंची गटवार यादी देण्यात येते. यंदा शर्यत संपल्यानंतरही ही यादी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे थेट समालोचन करणाऱ्यांची व थेट प्रक्षेपण करणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली.
*  मुख्य मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंपेक्षा पायलट्सच जास्त होते. या पायलट्सनी शर्यतीचा मार्ग निधरेक राहील याची काळजी घेणे अपेक्षित असते, मात्र या पायलट्सचा त्रासच झाला, असे काही परदेशी खेळाडूंनी सांगितले.