फिनलँडने लिएचेनस्टेनचा ३-० असा पाडाव करत युरो चषकासाठी पहिल्यांदाच पात्र ठरण्याची किमया साधली आहे. स्वीडननेही रोमानियावर २-० असा विजय मिळवत पुढील वर्षीच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

फिनलँडने आपल्या फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याचा मान पटकावला आहे. नॉर्विच सिटीचा आघाडीवीर टीमू पुक्की याच्या दोन गोलमुळे, तर जस्से टुओमिनेन याने सुरुवातीलाच केलेल्या गोलमुळे फिनलँडने मोठा विजय मिळवला. फिनलँडने ज-गटात १८ गुणांसह इटलीपाठोपाठ (२७ गुण) दुसरे स्थान मिळवत मुख्य फेरीत आगेकूच केली आहे.