|| प्रशांत केणी

क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडताना माझ्या प्रयत्नांना कुटुंबाचे पाठबळ अतिशय महत्त्वाचे ठरले, अशी प्रतिक्रिया भारताचा अष्टपैलू क्रिकेपटू शार्दूल ठाकूरने व्यक्त केली.

ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात शार्दूलने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत सर्वाधिक ६७ धावांची खेळी साकारली आणि वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने १२३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून भारताला तारले. याशिवाय त्याने सामन्यात सात बळीसुद्धा मिळवले. दुखापतीमुळे फक्त १० चेंडूंपुरत्या मर्यादित राहिलेल्या पदार्पणामुळे खचलो. परंतु हे दु:ख एका दिवसांत गुंडाळून पुनरागमनासाठी जिद्दीने प्रयत्न केले, असे शार्दूलने सांगितले. भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शार्दूलशी केलेली खास बातचीत-

 ब्रिस्बेन कसोटीत भारत कठीण स्थितीत असताना तू आणि वॉशिंग्टन मैदानावर होतात. तुम्ही कशा रीतीने हे आव्हान पेलले?

वॉशिंग्टन आणि मी जेव्हा फलंदाजीला मैदानावर होतो, तेव्हा भारताची स्थिती खराब होती. धावफलकावर ६ बाद १८६ धावा झळकत होत्या. त्या वेळी मोठे फटके खेळणे किंवा वेगाने धावा काढण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे खेळपट्टीवर बराच काळ ठाण मांडल्यास ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज थकतील, हेच समीकरण आम्ही आखले होते. कारण ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सलग चौथी कसोटी खेळत होते. याच भावनेने वारंवार चर्चा करीत खेळपट्टीवर मी अडीच तास आणि वॉशिंग्टन साडेतीन तास स्थिरस्थावर झाल्यामुळे धावा सहजपणे निघू लागल्या. कारण मोठे फटके खेळण्याची क्षमता आम्हा दोघांकडेही आहे.

 दुखापतीमुळे अपयशी ठरलेले १० चेंडूंचे पदार्पण ते यशस्वी दुसरा सामना या दोन वर्षांकडे कसे पाहतोस?

दुखापत हा कोणत्याही खेळाडूच्या कारकीर्दीचा भाग असतो. त्यामुळे घडलेल्या घटनेला स्वीकारून पुढील वाटचाल करणे महत्त्वाचे असते. जीवनातील स्वप्नवत वाटणारी पहिलीच कसोटी आणि १० चेंडूंनंतर दुखापत झाल्यामुळे पहिल्या दिवशी मला अत्यंत वाईट वाटले. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुखापतीचे दु:ख विसरून मी कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनासाठी नव्या जोमाने कामगिरी केली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या मेहनतीचे चीज झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 क्रिकेटमधील उमेदीच्या दिवसांत पालघर ते बोरिवली किंवा चर्चगेट हा रेल्वे प्रवास तुला नित्याने करावा लागला. आता त्या आव्हानात्मक प्रवासाकडे पाहिल्यावर  काय वाटते?

पालघर ते मुंबई हा प्रवास क्रिकेट खेळणाऱ्यांसाठीच नव्हे, तर दैनंदिन नोकऱ्या करणाऱ्यांसाठीही कठीण आहे. क्रिकेट सामने सर्वसाधारणपणे नऊ साडेनऊला सुरू होतात, सराव तर त्याहून आधी सुरू होतो. पाठीवर जड किट बॅग घेऊन मुंबई गाठायची तर भल्या पहाटे उठून एक तास आधी तयारी सुरू करावी लागायची. मग हा अडीच-तीन तासांचा प्रवास नियोजनबद्ध पद्धतीने करायचा. दिवसभर खेळून रात्री उशिरा घरी परतल्यावर पाच-सहा तासांची झोप काढायचो. मग पुन्हा दुसऱ्या दिवसाची धावपळ सुरू व्हायची. ते दिवस आजही आठवतात. भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न जगत असल्याने हे जोशात करीत होतो. आता इतक्या वर्षांनी ते क्षण आठवल्यावर स्वत:चेच कौतुक वाटते.

 भरत चामरे, दिनेश लाड, रवी शास्त्री अशा विविध प्रशिक्षकांच्या तुझ्या आयुष्यातील योगदानाबद्दल काय सांगशील?

कारकीर्दीच्या प्राथमिक दिवसांत १३ आणि १५ वर्षांखालील क्रिकेट खेळताना भरतसरांनी माझ्या गोलंदाजीवर अतिशय मेहनत घेतली. इनस्विंग, आऊटस्विंग, वेग कसा वाढवावा ही सर्व कौशल्ये त्यांनी मला शिकवली. मग लाड सरांनी प्रथमदर्शनीच माझ्यापुढे मुंबईत खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. ते मार्गदर्शक असलेल्या बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेत प्रवेश घ्यायला सांगितला. मग माझी मुंबईत राहण्याची व्यवस्था होत नसल्याने त्यांनी स्वत:च्याच घरी मला आसरा दिला. त्यांनी गुरू आणि वडील या दोन्ही भूमिका माझ्या क्रिकेट कारकीर्दीत पदोपदी निभावल्या. त्यांचे ऋण मला कधीच फेडता येणार नाहीत. कारण मुंबईतील क्रिकेटमध्ये आल्यामुळेच आयुष्याला कलाटणी मिळाली. याचप्रमाणे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य अनेक प्रशिक्षकांनी विविध वयोगटांचे क्रिकेट, रणजी, ‘आयपीएल’, भारतीय ‘अ’ संघ अशा जडणघडणीच्या प्रवासात मला योग्य वेळी दिशादर्शन केले.

क्रिकेटपटू म्हणून घडताना कुटुंबाचे पाठबळ किती महत्त्वाचे होते?

क्रिकेटपटू म्हणून घडताना माझ्या कुटुंबाने मला नेहमीच पाठबळ दिले. कारण माझ्या संपूर्ण कुटुंबात क्रिकेटसह खेळाचे पोषक वातावरण होते. माझे वडील, माझे दोन काका आणि मामा हे स्थानिक दर्जाचे क्रिकेट खेळले आहेत. माझे एक काका तर कांगा लीग, टाइम्स शिल्ससुद्धा खेळले आहेत. इतकेच नव्हे तर आई आणि कुटुंबातील अन्य महिलाही शाळा-महाविद्यालयीन दिवसांत खेळाशी निगडित आहेत. त्यामुळे लहानपणी मी जेव्हा क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कुणीही त्याला विरोध केला नाही. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडवताना माझ्या प्रयत्नांना कुटुंबाचा सातत्यपूर्ण पाठिंबा मिळत होता, हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. माझे अभ्यासाकडेही तितकेच लक्ष होते. बऱ्याचदा परीक्षेच्या कालखंडातसुद्धा सराव किंवा सामने असायचे. अशा वेळी पालकांकडून खेळाला विरोध होतो. परंतु माझ्या घरी क्रीडात्मक वातावरण असल्याने परीक्षेचे कारण दाखवून अडवणूक कधीच झाली नाही.