नितीन मुजुमदार – response.lokprabha@expressindia.com

सध्या सगळीकडे फुटबॉल विश्वचषकाचं वेड दिसून येतंय. आतापर्यंतचे अनेक सामने रंजक, आश्चर्यकारक आणि वेगळं वळण देणारे ठरले. आता विश्वचषकाचा उत्तरार्ध आधिक रंजक असेल असंही चित्र दिसून येतंय.

रशियात सुरू असलेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पध्रेत सुरुवातीलाच फक्त प्रस्थापित फुटबॉल संघांनाच मोठे धक्के बसले आहेत असे नाही तर मेस्सीसारख्या काही प्रस्थापित खेळाडूंना देखील सुरुवातीला अपेक्षेनुसार खेळ उंचावता आलेला नाही.

रशियातील या स्पध्रेच्या आधी पात्रता फेरीतच काही संघांनी धक्कादायक निर्गमन केले होते. चार वेळेला वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा जिंकणारा इटलीचा संघ या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला नाही. १९५८ नंतर प्रथमच इटलीचा फुटबॉल संघ वर्ल्ड कपमध्ये खेळत नाहीये. प्ले ऑफमध्ये इटली स्वीडनकडून हरला. याखेरीज १९७४, १९७८ आणि २०१० साली झालेल्या वर्ल्ड कप स्पध्रेत उपविजेता ठरलेला डच राष्ट्रीय संघही युरो २०१६ पाठोपाठ वर्ल्ड कप २०१८ लाही मुकला आहे.

आता बाद फेरीतही गटवार साखळीसारखे अपसेट्स बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘ए’ ग्रुपमध्ये पहिल्या दोन फेऱ्यांचा अंदाज घेतला तर यजमान रशियाबरोबर उरुग्वे बाद फेरीत प्रवेश करेल असे वाटते. स्पध्रेत भाग घेणाऱ्या ३२ संघांपकी सर्वात खाली जागतिक क्रमवारी असलेला संघ म्हणजे यजमान रशिया. मात्र २००८ साली युरोपियन चॅम्पियनशीप्सची सेमी फायनल गाठल्यावर रशियाने एकाही स्पध्रेची बाद फेरीदेखील गाठलेली नाही. या स्पध्रेत त्यांना तुलनात्मकदृष्टय़ा सोपा गट मिळाला होता. उरुग्वेने १९३० आणि १९५० साली वर्ल्ड कप फुटबॉलचे जेतेपद मिळविले आहे तर गेल्या दोन वर्ल्ड कप स्पर्धामध्ये त्यांनी गटवार साखळीत २०१४ मध्ये कोस्टा रिका विरुद्धचा सामना वगळता एकही सामना गमावलेला नाही. या गटात असलेल्या सौदी अरेबियाने स्पध्रेतील आपल्या पहिल्या दोन सामन्यांत एकही विजय नोंदविलेला नाही. त्यांचा हा पाचवा वर्ल्ड कप. मात्र याआधीच्या चार वर्ल्ड कप स्पर्धात त्या संघाने केवळ एक विजय नोंदविला आहे. (वि.बेल्जियम १-०,१९९४). इजिप्तचा हा १९९० नंतरचा पहिलाच वर्ल्ड कप, मात्र त्यांनाही सौदी अरेबियाप्रमाणेच फार आशा नाहीत.

‘बी’ ग्रुपमध्ये पोर्तुगाल, स्पेन, इराण व मोरोक्को हे चार संघ आहेत. आतापर्यंतच्या कामगिरीनुसार पोर्तुगाल व स्पेन बाद फेरी गाठतील असे वाटते. स्पेनला मागील दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धामध्ये पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी त्यांनी पोर्तुगालविरुद्ध ३-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी ५८व्या मिनिटाला घेतली होती व गेल्या तीन वर्ल्ड कप स्पर्धामध्ये प्रथमच स्पेनला स्पध्रेतील आपल्या सलामीच्या सामन्यात विजयाची शक्यता दिसू लागली होती. पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने हॅट्ट्रिकसह ८७ व्या मिनिटाला केलेल्या फ्री कीकवरील गोलामुळे बरोबरीवर समाधान मानावे लागले. ३३ वर्षीय रोनाल्डोचा हा कदाचित अखेरचाच वर्ल्ड कप, त्यामुळे आपल्या शेवटच्या तीन वर्ल्ड कप स्पर्धामध्ये केवळ तीन गोल करू शकलेल्या रोनाल्डोने एका सामन्यातच आपली गोलसंख्या सहावर नेली! यानंतर पुढच्याच सामन्यात मोरोक्को विरुद्ध हेडरवर अप्रतिम गोल करून स्पध्रेतील आपला सलग चौथा गोल केला. या स्पध्रेत उजव्या पायाचा वापर करून, डाव्या पायाचा वापर करून तसेच हेडरच्या साहाय्याने असे विविध प्रकारचे गोल नोंदविण्याचा विक्रम त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी केला आहे.

‘सी’ ग्रुपमध्ये फ्रान्स, पेरू, डेन्मार्क व ऑस्ट्रेलिया हे तुलनेने ग्लॅमर नसलेले संघ! या गटात पहिल्या दोन फेऱ्यांनंतर बाद फेरीत गेलेल्या फ्रान्सबरोबर डेन्मार्क हा देश बाद फेरीत जाण्याची शक्यता दिसते. फ्रान्सने आतापर्यंत युरोपमध्ये झालेल्या प्रत्येक वर्ल्ड कप स्पध्रेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याही स्पध्रेत त्यांनी आपले दोन्ही सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्क फ्रान्सकडून १९९८ मध्ये वर्ल्ड कप स्पध्रेत पराभूत झाला होता तर २००२ मध्ये डेन्मार्कने बाजी पलटवली होती. २०१० च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये नेदरलँडचे नेतृत्व करणारा बर्ट व्हॅन मारविक सध्या ऑस्ट्रेलियाचा कोच आहे ही ऑसीजची जमेची बाजू. या गटातून ऑस्ट्रेलियाला बाद फेरीत यायची संधी कमी आहे. पेरूसारख्या ३६ वर्षांनी वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या संघाला तर ती संधी अजिबात नाही!

‘डी’ ग्रुपमध्ये अर्जेटिना, क्रोएशिया, आइसलँड व नायजेरिया हे चांगले संघ आहेत. पदार्पण करणाऱ्या आइसलँड देशाची लोकसंख्याच मुळी जेमतेम साडेतीन लाख आहे! या संघाने पहिल्याच सामन्यात बलवान अर्जेटिनाला १/१ असे रोखून सर्वानाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. नंतर क्रोएशियाने तर अर्जेटिनाला ३/० असा मोठा तडाखा दिला. या ग्रुपमधून क्रोएशियाचा बाद फेरीत प्रवेश निश्चित आहे. संपूर्ण स्पध्रेत सर्वाधिक चुरस असलेला हा ग्रुप आहे. अर्जेटिनाच्या लिओनेल मेस्सीचा सूर हरवलेला असला तरी गेल्या १२ वर्ल्ड कप स्पर्धात अर्जेटिनाने ११ वेळा बाद फेरी गाठली आहे ही बाब देखील महत्त्वाची आहे. ते अडखळत का होईना पण बाद फेरीत जातील असे वाटते.

‘इ’ ग्रुपमध्ये देखील चांगली चुरस दिसली. या गटात ब्राझील, स्वित्र्झलड, कोस्टा रिका व सर्बयिा हे संघ होते. ब्राझील हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी एक दावेदार संघ आहे. भरपूर अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला कोस्टा रिका संघ लागोपाठ सर्बयिा व ब्राझीलकडून स्वीकारलेल्या पराभवांमुळे स्पध्रेबाहेर गेला आहे. या गटात ब्राझील व स्वित्र्झलड ही महत्त्वपूर्ण लढत बरोबरीत सुटली. ब्राझीलला नेयमारच्या दुखपतींमुळे हैराण केले आहे.

‘एफ’ ग्रुपमध्ये आहेत जर्मनी, स्वीडन, मेक्सिको व द कोरिया. गतविजेत्या जर्मनीला १/० असे हरवून मेक्सिकोने आपल्या मोहिमेची सुरुवात फारच धडाकेबाज केली. त्यांनी नंतर द. कोरियालाही हरवत बाद फेरीत प्रवेश केला. या गटात दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस दिसली. या वर्ल्ड कपसह गेल्या तीन वर्ल्ड कप स्पर्धामध्ये गत विजेते स्पध्रेतील आपला पहिला सामना जिंकू शकलेले नाहीत. गतविजेत्या जर्मनीलाही यंदा सलामीला पराभव बघावा लागला. २०१० मध्ये इटली-पराग्वे सामना १/१ असा बरोबरीत सुटला होता तर २०१४ मध्ये स्पेनला नेदरलँडकडून ५/१ असा मोठा पराभव पत्करावा लागला.

‘जी’ ग्रुप मध्ये बेल्जियम, इंग्लण्ड, टय़ूनिशिया व पनामा अशी लाइन अप होती. या ग्रुपमधून इंग्लंड व बेल्जियम यांनी अपेक्षेप्रमाणे पहिले दोन क्रमांक मिळविले आहेत. ‘एच’ ग्रुप हा स्पध्रेतील शेवटचा आणि सर्वाधिक खुली स्पर्धा असलेला ग्रुप होता. या ग्रुपमधून जपान, सेनेगल व कोलंबिया हे संघ पहिल्या दोन क्रमांकांचे दावेदार आहेत. कोलंबियाने २०१४ मध्ये तर सेनेगलने २००२ मध्ये वर्ल्ड कपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

लवकरच बाद फेरीचे अधिक उत्कंठावर्धक सामने खेळण्यास सुरुवात होईल. या स्पध्रेचा हा सेकंड हाफ नक्कीच अधिक रंगतदार होईल!
सौजन्य – लोकप्रभा