06 August 2020

News Flash

मोक्याचा क्षणी स्पेनचा गोलहल्ला

भरपाई वेळेतील पेनल्टी स्पॉट किकवर रुईझने गोल करून स्पेनला २-१ असा विजय मिळवून दिला.

माजी विजेता फ्रान्स आणि स्पेन या युरोपातील देशांमधील फुटबॉलचा सामना म्हणजे क्रीडारसिकांसाठी पर्वणीच. जगाला अनेक दिग्गज फुटबॉलपटू देणाऱ्या या देशांच्या भविष्यातील ताऱ्यांमधील चुरस पाहतानाही, याची अनुभूती आली. कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अखेरच्या क्षणापर्यंत १-१ अशी बरोबरी होती. मात्र, अखेरच्या क्षणाला फ्रान्सच्या खेळाडूकडून झालेली चुक स्पेनच्या पथ्यावर पडली आणि स्पेनच्या अ‍ॅबेल रुईझने हा मोक्याचा क्षण हेरला.

भरपाई वेळेतील पेनल्टी स्पॉट किकवर रुईझने गोल करून स्पेनला २-१ असा विजय मिळवून दिला. या निकालासह युरोपियन विजेत्या स्पेनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

संपूर्ण सामन्यात चेंडूवर समसमान ताबा. गोल करण्याचे समसमान प्रयत्न आणि बचावाची फळीही तितकीच मजबूत, असे चित्र फ्रान्स आणि स्पेन यांच्या लढतीत पाहायला मिळाले. दोन्ही संघातील खेळाडूंनी सर्वोत्तम खेळ करताना एकमेकांना विजयापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले. अखेरच्या क्षणापर्यंत हे प्रयत्न यशस्वी ठरतील, असेच दिसत होते. मात्र, भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला औमार सोलेटने चेंडू हिसकावण्यासाठी स्पेनच्या जोस लाराला दिलेला धक्का फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरला. पंचांनी त्वरित स्पेनला पेनल्टी स्पॉट किक बहाल केली आणि रुईझने त्यावर गोल करत २-१ असा विजय निश्चित केला. अखेरच्या मिनिटाला फ्रान्सकडून विल्सन इसिडोरने हेडरद्वारे गोलजाळीच्या दिशेने टोलावलेला चेंडू स्पेनचा गोलरक्षक अलव्हारो फर्नाडेजने अडवला आणि २००१मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2017 1:14 am

Web Title: fifa u 17 world cup spain beat france
Next Stories
1 इंग्लंडकडून जपानचे शूटआऊट
2 मालीकडून इराकचा धुव्वा
3 Pro Kabaddi Season 5 – हरियाणाकडून साखळी सामन्याचा शेवट विजयाने, पुणेरी पलटणचा पराभव
Just Now!
X