हॉकी इंडियाचे माजी अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी आपलं नाव आणि धर्मामुळे आपल्याला पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी मुश्ताक अहमद यांनी हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. २०११ पासून आपण सर्व नियमांचं पालन करत अध्यक्षपदाचं काम करत होतो, पण केवळ आपण अल्पसंख्यांक समाजातून असल्यामुळे आपल्यावर राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आल्याचं मुश्ताक अहमद म्हणाले. मुश्ताक अहमद यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पाच पानांचं पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मी अल्पसंख्यांक समाजातून असल्यामुळे मला अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं गेलं अशी माझी भावना आहे. खो-खो, हँडबॉल आणि तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष नियमांचं उल्लंघन करुनही त्यांना काम करायला दिलं जातं. या तिन्ही संघटनेच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय क्रीडा संहितेचं उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळेच माझं नाव मुश्ताक अहमद असल्यामुळे आणि मी अल्पसंख्यांक समाजातून असल्यामुळे मला राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आल्याचं मला वाटतंय”, आपल्या पत्रात मुश्ताक अहमद यांनी आरोप केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

माझं नाव मुश्ताक अहमद असल्यामुळे माझ्यावर जाणुन-बुजून कारवाई करण्यात आली आहे असं मी पुन्हा म्हणेन. क्रीडा मंत्रालयाकडून माझ्या शंकाचं योग्य निरसन झालं नाही तर मी पंतप्रधान कार्यालयापासून न्यायालयापर्यंत सर्वांकडे दाद मागेन असं अहमद यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. ७ जुलै रोजी अहमद यांनी हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. क्रीडामंत्रालयाने हॉकी इंडियाला अहमद यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई झाली. त्यामुळे क्रीडा मंत्रालय मुश्ताक अहमद यांच्या पत्रावर काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.