नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार आणि सर्वाधिक भरवशाचा आक्रमक खेळाडू सरदार सिंगने हॉकीमधील कारकीर्दीला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. १२ वर्षांच्या हॉकी कारकीर्दीत मिळालेल्या अनेक मान-सन्मानानंतर निवृत्तीची हीच योग्य वेळ असल्याचे ३२ वर्षीय सरदारने सांगितले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला विजेतेपद कायम राखण्यात अपयश आल्यामुळे केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यात वाढते वय आणि खेळाचा वाढता वेग यांच्यात ताळमेळ जुळवण्यात फरक पडत असल्याचे लक्षात आल्यामुळेच हा निर्णय त्याने घेतला.

‘‘१२ वर्षे हा कारकीर्दीच्या दृष्टीने खूप मोठा काळ आहे. त्यामुळे मी समाधानी असून आता नवीन पिढीने सूत्रे हातात घेण्याची वेळ आली आहे. मी माझ्या कुटुंबासह मित्रांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे,’’ असे सरदारने नमूद केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान सरदारने आपल्यात अजून हॉकी खेळण्याची क्षमता शिल्लक असल्याने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत खेळण्याचा इरादा बोलून दाखवला होता. दरम्यान, राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठीच्या २५ जणांची नावे ‘हॉकी इंडिया’ने घोषित केल्यानंतर त्यात नाव नसल्यामुळेच सरदारला हा निर्णय घ्यावा लागला असण्याचीदेखील शक्यता आहे. सरदार शुक्रवारी दिल्लीत अधिकृतरीत्या निवृत्ती जाहीर करणार आहे. राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली तरी स्थानिक स्पर्धामधून तो खेळत राहणार असून त्याबाबत प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना कल्पना देण्यात आली असल्याचे त्याने सांगितले.

नेतृत्व व मानसन्मान

२००६ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून सरदारच्या भारतीय संघातील कारकीर्दीला प्रारंभ झाला होता. २००८ मध्ये सुलतान अझलन शाह चषकात त्याने भारताचे नेतृत्व केले, तेव्हा तो भारताचा सर्वात युवा कर्णधार ठरला होता. २०१२ मध्ये अर्जुन, तर २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. त्याशिवाय दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.