पाकिस्तान संघाचा माजी सलामीवीर नासीर जमशेदने, पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेच्या २०१६-१७ हंगामात स्पॉट फिक्सींग केल्याची कबुली दिली आहे. सोमवारी इंग्लंडमध्ये मँचेस्टर क्राऊन कोर्टात नासीरने आपल्यावरील आरोप मान्य केले. गेली दोन वर्ष नासीर आपल्यावरील आरोप फेटाळत होता, मात्र अखेरीस त्याने आपल्यावरील फिक्सिंगचे आरोप मान्य केले आहेत. नासीरने आपला सहभाग मान्य केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कोर्ट शिक्षा सुनावणार आहे.

२०१८ साली नासीर जमशेदला १० वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात तपास अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य न केल्यामुळे आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली होती. २०१६ साली बांगलादेश प्रिमीअर लिग स्पर्धेत जमशेदने पहिल्यांदा फिक्सिंग केलं होतं. यानंतर २०१६-१७ च्या पाकिस्तान सुपरलिग हंगामात जमशेदने बुकींकरवी पैसे घेत खेळाडूंना पैसे दिल्याचं सिद्ध झालं आहे.

ठराविक चेंडूवर धावा न काढणं आणि अशा अनेक गोष्टींसाठी नासीरने पैसे घेतलेले होते. पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेतही इस्लामाबाद विरुद्ध पेशावर सामन्यातही तो फिक्सींगमध्ये सहभागी होता. नासिरने आपल्या कारकिर्दीत ४८ वन-डे, १८ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोर्ट जमशेदला काय शिक्षा सुनावतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.