पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर तौफिक उमरला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला तौफिक उमर आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानी संघाचा महत्वाचा फलंदाज मानला जायचा. २०१४ साली न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना हा त्याचा अखेरचा सामना ठरला होता. करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तौफिकने स्वतःला क्वारंटाइन केलेलं आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. या विषाणूची लागण होणारा तौफिक उमर हा पहिला क्रिकेटपटू असल्याचं मानलं जात आहे.

२००१ साली बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात तौफिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात तौफिकने १०४ धावांची खेळी करत संघाच्या विजयाच मोलाचा हातभार लावला होता. मात्र सतत होणाऱ्या दुखापतींमुळे तौफिक संघात आपलं स्थान कायम राखू शकला नव्हता. २०१६ साली तौफिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. पाकिस्तानातही करोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. लॉकडाउनमुळे क्रिकेट स्पर्धा बंद असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसी क्रिकेटची गाडी पूर्वपदावर आणण्याचं प्रयत्न करत आहे. जुन-जुलै महिन्यात पाकिस्तानी संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणं अपेक्षित आहे.