जगभरातल्या वेगवान गाडय़ांचा ताफा, व्रूम व्रूमचे आवाजी तांडव, वेटेल-शूमाकर-हॅमिल्टन या चालकांची मांदियाळी. हे सारे चाहत्यांना भारतात अनुभवायला मिळते ते दिल्लीजवळच्या बुद्धा सर्किटमध्ये. या स्पर्धेने भारताची जगभरात एक अनोखी ओळख निर्माण केली असली तरी पुढच्या वर्षी हा थरार थंडावणार आहे.  फॉम्र्युला वनचे सर्वेसर्वा बर्नी इक्लेस्टोन यांनीच या संदर्भात सूतोवाच केले आहे. तूर्तास हा निर्णय एक वर्षांपुरता असला तरी आयोजनामधील अडथळे बघता भविष्यातही भारतात फॉम्र्युला वन शर्यतीच्या आयोजनावरही संशयाचे ढग दाटले आहेत.
प्रत्येक वर्षीच्या शर्यतींची संख्या २० अशी मर्यादित करण्यात येणार आहे. भारताऐवजी २०१४ मध्ये रशियाला आयोजनाची संधी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. हंगेरी ग्रां.प्रि. प्रसंगी इक्लेस्टोन यांनी भारतात २०१४ मध्ये फॉम्र्युला वन शर्यत होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. याचे कारण विचारले असता, यामागे राजकीय कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय ग्रां.प्रि.चे भवितव्य सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक मोटारस्पोर्ट काऊंसिलच्या बैठकीत निश्चित होणार आहे. या बैठकीत इक्लेस्टोन २०१४ हंगामासाठीच्या तात्पुरत्या कार्यक्रमाची आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघासमोर मांडणी करणार आहेत.
२०११मध्ये भारतात नवी दिल्लीतील बुद्धा सर्किटवर पहिल्यावहिल्या फॉम्र्युला वन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यंदा २७ ऑक्टोबरला वर्षांतील १९व्या शर्यतीचे भारतात आयोजन होणार आहे. परंतु रशिया, न्यू जर्सी आणि ऑस्ट्रिया या तीन देशांची आयोजनासाठी प्राथमिक टप्प्यावर निवड झाली आहे. २२ विविध ठिकाणे फॉम्र्युला वन शर्यतीच्या कार्यक्रमात सहभागासाठी स्पर्धेत आहेत. मात्र दरवर्षी केवळ २० शर्यतीच असाव्यात, असा शर्यतीत सहभागी होणाऱ्या संघाचाच आग्रह असल्याने २ देशांचे यजमानपद धोक्यात आहे.
करविषयक कठोर र्निबध, शर्यतीसाठीच्या आर्थिक समीकरणांची व्यवहार्यता आणि शर्यतीच्या आयोजनात असलेले लाल फितीचे अडथळे या नकारात्मक मुद्दय़ांमुळे इक्लेस्टोन यांना हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा आहे.
गेल्याच महिन्यात शर्यत आयोजनाचे प्रमुख जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनल संस्थेने २०१४ मध्ये फॉम्र्युला वन शर्यत होणार नाही या वृत्ताचे खंडन केले होते.
काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी २०१४ इंडिया ग्रां.प्रि. होणार नाही अशा अफवा पसरवल्या होत्या. या वृत्ताला कोणताही आधार नाही आणि आमची प्रतिमा मलिन करण्याचा हा उद्देश आहे. फॉम्र्युला वन व्यवस्थापनाशी आमचा २०१५ पर्यंत करार असून, तोपर्यंत आम्ही शर्यतीचे आयोजन करणार असल्याचे जेपी समूहाने स्पष्ट केले होते, मात्र अवघ्या महिन्याभरातच हा दावा फोल असल्याचे इक्लेस्टोन यांच्या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झाले आहे.
इक्लेस्टोन यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर भविष्यातील फॉम्र्युला वन शर्यतीच्या आयोजनाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी इक्लेस्टोन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जेपी समूहाने म्हटले आहे. काही मुद्दय़ांवर सुधारणा होऊन शर्यतीचे आयोजन होऊ शकत,े असा आशावादही जेपी समूहाच्या प्रवक्त्याने व्यक्त केला.
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीवर सर्वकाही अवलंबून आहे. एका वर्षांत २० शर्यती व्हाव्यात अशी शर्यतपटूंची मागणी आहे, त्याच वेळी तीन नवीन देश आयोजनासाठी स्पर्धेत उतरल्याने इक्लेस्टोन यांच्या हातात सर्वकाही असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.