‘लोकसत्ता’च्या वेबसंवादात ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे परखड मत

मुंबई : गेल्या ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्र बुद्धिबळात वरचढ समजला जायचा. राष्ट्रीय संघात १४ पैकी १० खेळाडू हे महाराष्ट्राचे असायचे. त्यातही मुंबईच्या खेळाडूंचा भरणा अधिक असायचा; पण पाच दशकांत महाराष्ट्राची प्रगती झाली, असे म्हणता येणार नाही. वर्चस्व गाजवण्यात मुंबई-महाराष्ट्राची जागा पर्यायाने तमिळनाडूने घेतली. सद्य:स्थितीला चेन्नईत २३, तर महाराष्ट्रात फक्त सात ग्रँडमास्टर आहेत. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्राची जी स्थिती होती, ती आता तमिळनाडूची आहे, असे परखड विश्लेषण ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी केले.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सहप्रायोजित ‘लोकसत्ता सहज बोलता.. बोलता’ या कार्यक्रमात प्रवीण ठिपसे यांनी बुद्धिबळ खेळातील जुन्या ‘चाली’रीती आणि टाळेबंदीमुळे उदयास आलेल्या नवीन गोष्टींबद्दल दिलखुलासपणे आपली मते मांडली. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी घेतलेल्या या वेबसंवादादरम्यान प्रवीण ठिपसे यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तरे दिली.

कार्लसनच्या विचारांची खोली अफाट!

गॅरी कास्पारोव्ह आणि बॉबी फिशर यांचा विक्रम विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसन मोडेल, असे मला वाटते. चेन्नईत कार्लसनला जगज्जेता होताना पाहण्याची प्रत्यक्ष संधी मला मिळाली. पत्रकार परिषदेदरम्यान बुद्धिबळातील बारकावे सहजतेने सांगत असतानाच विश्वनाथन आनंदपेक्षा विशेष ज्ञान कार्लसनकडे आहे, याची खात्री मला पटली. कार्लसन हा जगाच्या १०-१५ वर्षे पुढे असून ज्याचा आतापर्यंत शोध लागला नाही, ते कार्लसनला कळाले आहे, असे मला वाटते. वयाच्या २२व्या वर्षी त्याच्यातील परिपक्वता मी स्वत:च्या डोळ्याने पाहिली. कोणत्याही क्षेत्रात अधिराज्य गाजवण्याची अफाट बुद्धिमत्ता त्याच्यात आहे. त्याचा बुद्धिबळातील रस कमी झाला तरच त्याला अन्य प्रतिस्पर्धी हरवू शकेल, असे सध्या तरी वाटत आहे. गेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत त्याने फॅबियानो कारुआनाविरुद्धचे १२ डाव बरोबरीत सोडवले. कारण जलद प्रकारात आपण सर्वोत्तम आहोत, याची त्याला खात्री होती. कार्लसनच्या विचारांची खोली ही अफाट आहे.

भविष्यात ऑनलाइन पद्धत रूढ होईल!

टाळेबंदीमुळे सध्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धाचे पेव फुटले असूनभविष्यात ऑनलाइन बुद्धिबळाचा प्रघात पडण्याची शक्यता आहे. ऑनलाइन खेळू शकतो, असा बुद्धिबळ हा जगातील एकमेव खेळ आहे. मात्र ऑनलाइन बुद्धिबळाचे अर्थकारण खूपच बिकट असून हा खेळ जिवंत ठेवण्यासाठी कार्लसनने अनेक स्पर्धा प्रायोजित केल्या. मात्र ऑनलाइन बुद्धिबळामध्ये एकाच जागेवर अडीच-तीन तास बसून राहणे, कोणतेही गॅझेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे न वापरणे यांसारख्या अटी असल्या तरी फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. अलीकडेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने एका स्पर्धेदरम्यान फसवणूक करणाऱ्या ८० खेळाडूंना बाद केले. तरीही पुढील एक ते दीड वर्षे ऑनलाइन बुद्धिबळाचा पायंडा पडू शकतो. त्यासाठी पुरस्कर्ते पुढे येण्याची आणि महासंघानेही हा खेळ जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याआधी मीसुद्धा कधीही ऑनलाइन स्पर्धेत भाग घेतला नव्हता; पण टाळेबंदीदरम्यान मी पाच ऑनलाइन स्पर्धामध्ये खेळलो.

पुरस्कर्ते शोधण्यासाठी आनंदने पुढाकार घेण्याची गरज

नॉर्वे, बल्गेरिया यांसारख्या देशांच्या राष्ट्रीय संघटनांनी चांगले कार्यक्रम राबवून पुरस्कर्ते शोधण्याचा प्रयत्न केला. नॉर्वेने कार्लसनला हाताशी धरत पुरस्कर्ते आणण्यासाठी प्रयत्न केले; पण सांघिक प्रयत्नांमध्ये भारत नेहमीच कमी पडतो. भारतात सगळ्याच खेळांमध्ये सारखीच अवस्था आहे. त्यामुळे पुरस्कर्ते किंवा प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या आयोजनासाठी संघटनेलाच जाब विचारायला हवा. भारतीय बुद्धिबळ महासंघाने विश्वनाथन आनंदला विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत पुरस्कर्त्यांना गळ घालायला हवी. कार्लसन ज्या पद्धतीने पुरस्कर्ते शोधण्यासाठी पुढाकार घेतो, त्याचप्रमाणे आनंदनेही पुढे पावले टाकण्याची गरज आहे.

करिअरपेक्षा खेळाचा आनंद लुटा!

बुद्धिबळात कारकीर्द घडवणे आणि विजेतेपद मिळवणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टींकडे आपण पाहायला हवे. अन्य खेळांमध्ये कारकीर्द घडवता येऊ शकते, पण बुद्धिबळात आर्थिक उत्पन्नाचे स्रोत कमी असल्यामुळे कारकीर्द घडवण्यापेक्षा बुद्धिबळाचा आनंद लुटणे योग्य ठरू शकते. बुद्धिबळात अव्वल खेळाडूंमध्ये राहण्याचा कालावधी खूप कमी असतो. अव्वल स्थान गमावल्यानंतर अनेकांची आर्थिक गणिते बिघडतात. त्यामुळे सर्वप्रथम उत्पन्नाचे अन्य स्रोत शोधून बुद्धिबळात कारकीर्द घडवणे सोपे जाईल. भारतात आनंद वगळला तर अन्य सर्व खेळाडू वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह चालवतात. देशात कबड्डीपटूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळते, पण बुद्धिबळपटूंना नोकऱ्यांची मोजकीच संधी मिळते. त्यामुळे अन्य गोष्टी करतानाच ग्रँडमास्टर होणे शक्य आहे.

बुद्धिबळाचे पुस्तक लिहायला आवडेल!

जवळपास ४० वर्षे बुद्धिबळ खेळत असताना अनेक महान खेळाडूंच्या संपर्कात आलो. अनेक नामवंत प्रशिक्षकांकडून मला शिकण्याची संधी मिळाली. माजी जगज्जेता बोरिस पास्की यांच्याकडून मी बरेच काही शिकलो. या अनेक चांगल्या व्यक्तिमत्त्वांशी खेळताना, संवाद साधताना त्यांचे अंतरंग उलगडत गेले. या सर्वाच्या अनेक आठवणी माझ्या मनात साठवून ठेवल्या आहेत. हा आठवणींचा खजिना पुस्तकरूपात आणण्याची माझी खूप इच्छा आहे. त्यांच्यावर एखादे पुस्तक लिहायला मला नक्कीच आवडेल.

कोनेरू हम्पी जगज्जेतेपदाची दावेदार

ज्युडिथ पोल्गरनंतर अफाट गुणवत्ता मला कोनेरू हम्पीमध्ये दिसली. भावी जगज्जेती म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते; पण जगज्जेतेपदाच्या समीप पोहोचूनही तिला हा किताब मिळवता आला नाही, याचेच आश्चर्य अधिक वाटते. हम्पीला पुरस्कर्ते तसेच केंद्र सरकार आणि संघटनेकडून म्हणावे तितके पाठबळ मिळाले नाही. स्वत:च्या जोरावरच तिने आतापर्यंत इतकी मोठी झेप घेतली आहे; पण पुढील पाच वर्षांत ती दोन वेळा जगज्जेती होईल, असा माझा ठाम विश्वास आहे.

प्रशिक्षणापेक्षा खेळायलाच जास्त आवडेल!

जवळपास ४५ वर्षे मी नोकरी सांभाळून प्रशिक्षण द्यायचो. ८३-८४ साली सहचारिणी भाग्यश्री ठिपसे यांच्यापासूनच मी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आजही अनेक ग्रँडमास्टर्स माझ्याकडून प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र पूर्ण वेळ प्रशिक्षक होण्यासाठी खेळणे सोडून द्यावे, हा विचार माझ्या मनात कधीही आला नाही. खेळण्यातली मजा वेगळीच आहे. अधिकाधिक खेळाडू ग्रँडमास्टर व्हावेत आणि वेगळी प्रतिभा असणाऱ्यांना शिकवण्याची माझी इच्छा आहे; पण प्रशिक्षणार्थी एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर आणि आपल्याकडील ज्ञानाची पोतडी रिकामी झाल्यानंतर मी त्यांना माझ्यापेक्षाही चांगला प्रशिक्षक शोधण्याचा सल्ला देत असतो.

आनंदमध्ये नैसर्गिक प्रगल्भता!

जन्मजात बुद्धिबळ खेळण्यासाठी विश्वनाथन आनंदचा जन्म झाला आहे, असे त्याच्याबाबतीत नक्कीच म्हणता येईल. आनंदची प्रतिभा अफाट आहे. ८०चे दशक मी गाजवल्यानंतर आनंद ८६ ते ८८ अशी सलग तीन वर्षे राष्ट्रीय विजेता झाला. त्यानंतर त्याने देशांतर्गत स्पर्धामध्ये खेळणे थांबवले. त्यानंतर वयाच्या २१व्या वर्षी जगातील अव्वल पाच खेळाडूंमध्ये मिळवलेले स्थान आनंदने पन्नाशीनंतरही अबाधित राखले आहे. त्याच्याशी खेळताना एक वेगळाच आनंद मिळायचा. डाव संपल्यानंतर त्याच्याकडून बरेच काही शिकायला मिळायचे. ते ऐकताना पाहून लहानशा मुलासमोर आपला अनुभवही कमी पडायचा. त्याच्यात नैसर्गिक प्रगल्भता होती.