भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याने ग्रेन्क क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीत मायकेल अ‍ॅडम्स या ब्रिटिश खेळाडूविरुद्ध बरोबरी स्वीकारली. सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत इटलीच्या फॅबिआनो कारुआना याने पहिल्या फेरीत एक गुणासह आघाडी घेतली आहे. त्याने जर्मनीच्या जॉर्ज मेईर याच्यावर शानदार विजय मिळविला. अर्कादजी नैदितिश व डॅनियल फ्रिडमन या दोन्ही जर्मन खेळाडूंमधील डाव बरोबरीत राहिला. आनंद, नैदितिश, फ्रिडमन व अ‍ॅडम्स यांचा प्रत्येकी अर्धा गुण झाला आहे. आनंदने अनुभवी अ‍ॅडम्सविरुद्ध कल्पकतेने खेळ केला. काळ्या मोहरांच्या साहाय्याने खेळणाऱ्या आनंदने १६व्या चालीला हत्तीची अनपेक्षित चाल करीत अ‍ॅडम्सला संभ्रमात टाकले. त्यामुळे अ‍ॅडम्सला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेतले. डावातील गुंतागुंत वाढल्यामुळे दोन्ही खेळाडूंनी ४३ व्या चालीस डाव अनिर्णित ठेवला.