भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी पाठीच्या दुखापतीतून मायकेल क्लार्क सावरेल अशी ऑस्ट्रेलियाला अपेक्षा आहे. या उद्देशाने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने क्लार्कची भारत दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. परंतु क्लार्कबाबत साशंक असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने अंतिम संघात त्याची निवड ही तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियाने आपला अ‍ॅशेस प्रतिस्पर्धी इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत ३-२ असे हरवले होते. आता भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ सात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि राजकोटला होणारा एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत आपण खेळू शकू, यावर क्लार्कचा विश्वास आहे.
‘‘मी सध्यासुद्धा माझ्या खेळाचा आनंद लुटत आहे. भारतातही जाऊ शकलो तर मला नक्कीच आनंद होईल. आता तज्ज्ञांच्या मदतीने तंदुरुस्तीवर मी मेहनत घेत आहे,’’ असे क्लार्कने सिडनी येथे सांगितले.
ऑस्ट्रेलियाने आपला १४ सदस्यीय संघ जाहीर करताना धावांसाठी झगडणारा मॅथ्यू वेड, वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूड आणि फिरकी गोलंदाज फवाद अहमद यांना वगळले आहे. ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर जन्माने पाकिस्तानी असलेल्या अहमदने नुकतेच आपले पदार्पण साजरे केले होते. त्याऐवजी झेव्हिअर डोहर्टीला संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय वातावरणात डोहर्टी अधिक अनुकूल ठरेल, असे निवड समितीचे मत पडले. याचप्रमाणे निवड समितीने दुखापतग्रस्त फलंदाज शॉन मार्शलाही डच्चू दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात यष्टीरक्षणाची धुरा वाहणाऱ्या वेडला वगळल्यामुळे ब्रॅड हॅडिन हा भारत दौऱ्यासाठी एकमेव यष्टीरक्षक असणार आहे. इंग्लंड दौऱ्यावरील अ‍ॅशेस मालिकेत हॅडिनने यष्टीपाठी दमदार कामगिरी बजावली होती.
ऑस्ट्रेलियाचा संघ असा
मायकेल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), अ‍ॅडम व्होग्स, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), शेन वॉटसन, आरोन फिन्च, फिलिप ह्युजेस, मोझेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल जॉन्सन, जेम्स फॉल्कनर, नॅथन कल्टर-निले, क्लिंट मकाय, झेव्हियर डोहर्टी.