मुंबईकर पृथ्वी शॉला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत शॉने आश्वासक कामगिरी केली. यानंतर न्यूझीलंड दौऱ्यातही त्याने चांगला खेळ केला. रोहितच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवालसोबत पृथ्वी शॉला वन-डे संघात सलामीला येण्याची संधी मिळाली, मात्र इकडे तो अपयशी ठरला. असं असलं तरीही इतक्या कमी वयात पृथ्वी शॉने आपल्या फलंदाजीने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मुंबईकर खेळाडू वासिम जाफरने पृथ्वी शॉच्या खेळाचं कौतुक केलं असून त्याच्यात विरेंद्र सेहवागसारखा खेळाडू बनण्याची क्षमता असल्याचं म्हटलंय.

“पृथ्वी शॉ स्पेशल खेळाडू आहे यात कोणतीही शंका नाही. तो ज्या पद्धतीने फटके खेळतो, ते पाहण्यासारखं असतं. जर तो मैदानावर जास्तीत जास्त वेळ टिकून राहिला तर त्याच्यात विरेंद्र सेहवागसारखा खेळाडू बनण्याची क्षमता आहे. तो समोरच्या गोलंदाजांना अक्षरशः धुवून काढतो. मात्र यासाठी त्याला वारंवार आपले विचार सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. आपला खेळ समजून घेण्याची त्याला गरज आहे. गरज असेल तिकडे बॅकफूटवर जाणं हे त्याला शिकावं लागेल. न्यूझीलंडमध्ये तो दोनवेळा शॉर्ट बॉलवर बाद झाला, यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागेल”, वासिम आकाश चोप्राच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

मैदानासोबतच मैदानाबाहेर पृथ्वीच्या वागण्यात शिस्त यायला हवी असं मत जाफरने व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याचे सर्व गूण पृथ्वीमध्ये आहेत. मात्र यासाठी त्याच्या वागण्यात थोडी शिस्त यायला हवी. पृथ्वीच्या खेळाबद्दल जाफर व्यक्त झाला. २०१८ साली कसोटी पदार्पणात विंडीजविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात पृथ्वीने शतक झळकावलं होतं.