जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या हिमा दासचे प्रशिक्षक निपोन दास यांच्यावर काल एका महिला खेळाडूने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली. मात्र ANI या वृत्तसंस्थेशी बोलत असताना निपोन दास यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

“ज्या खेळाडूने माझ्यावर आरोप केले आहेत, ती अजुनही सरावासाठी येते आहे. जर मी दोषी आढळलो तर मला जरुर शिक्षा द्या. मात्र यात माजी काही चूक नसेल तर आरोप करणाऱ्या मुलीवरही कारवाई झाली पाहिजे.” निपोन दास यांनी आपली बाजू मांडली.

ज्या महिला धावपटूने निपोन दास यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, तिने गुवाहटी येथे निपोन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. पीडित धावपटूने नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, “गुवाहटी येथील सरुसजाई स्टेडिअममध्ये सरावादरम्यान माझ्यासोबत लैंगिक शोषणाचा प्रकार घडला होता. बऱ्याचदा प्रशिक्षक निपोन दास मला स्पर्श करायचे. मात्र, हे केवळ शारिरीक हालचालींमुळे घडत असावे असे मला वाटायचे. मात्र, डिसेंबर २०१७ मध्ये हरयाणात स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून आयोजित राष्ट्रीय चॅम्पिअनशिपमध्ये मी सहभागी झाले होते. स्पर्धा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात रेल्वेमधून उतरल्यानंतर निपोन दास यांनी मला घट्ट मिठी मारली.

यानंतर मे २०१८ मध्ये व्यायाम करुन झाल्यानंतर मी प्रशिक्षकांकडे बाथरुमला जाण्याची परवानगी मागितली. त्यावेळी निपोन यांनी माझ्यासोबत बाथरुममध्ये येण्याची इच्छा व्यक्त करीत मला जबरदस्तीने वॉशरुममध्ये ओढले आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास मला खेळातून बाहेर काढण्याची धमकीही दिली. या प्रकाराबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी निपोन दास यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.