इंदूर कसोटीत भारतीय संघाने न्यूझीलंडवर तब्बल ३२१ धावांनी विजय प्राप्त केला. किवींना तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने व्हाईटवॉश दिला. भारतीय संघाने या विजयासह कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान तर मिळवलेच पण फिरकीपटू आर.अश्विनने देखील इंदूर कसोटीत कमाल केली. अश्विन देखील गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. भारतीय संघासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केलेल्या भारतीय संघाला मानाची गदा देऊन यावेळी गौरविण्यात आले. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने ड्रेसिंग रुममध्ये या विजयाचे सेलिब्रेशन देखील केले. ‘आयसीसी’कडून प्रदान करण्यात आलेली गदा घेऊन सर्वांनी फोटोसेशन केले. विराट कोहलीसह संपूर्ण संघ यावेळी फोटो काढण्यात मग्न होते. प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देऊन विजय साजरा करत होते. संघाच्या व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य देखील खेळाडूंना शुभेच्छा देऊन आपला आनंद व्यक्त करत होते. प्रशिक्षक अनिक कुंबळे प्रत्येक खेळाडूची भेट घेऊन खेळाडूच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना दिसले.