भारताचा माजी क्रिकेटपटू हृषीकेश कानिटकरने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर प्रशिक्षण देण्याचा हृषीकेशचा मानस आहे. ४० वर्षीय डावखुरा फलंदाज आणि कामचलाऊ फिरकीपटू हृषीकेशने बुधवारी आपला निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सांगितला.
भारतीय संघातील तीन वर्षांच्या कारकीर्दीमध्ये हृषीकेश दोन कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने खेळला. ढाका येथे झालेल्या जानेवारी १९९८ ला सामन्यात पाकिस्तानचा अव्वल फिरकीपटू साकलेन मुश्ताकला अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला त्याने अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता.
महाराष्ट्रानंतर राजस्थान संघाचेही हृषीकेशने प्रतिनिधित्व केले होते. २०१३ डिसेंबरपासून हृषीकेश राजस्थानच्या संघात रुजू झाला होता. क्षेत्ररक्षणामुळे त्याने क्रिकेटला अलविदा केल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय संघातून बाहेर पडल्यावर हृषीकेशने २००० सालानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत रणजी करंडक स्पर्धेत आठ हजार धावांपेक्षा जास्त करणारा तो फक्त तिसरा कर्णधार ठरला.
रणजी स्पर्धेमध्ये त्याने २८ शतके झळकावली असून तो सर्वाधिक शतकांच्या यादीमध्ये संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे.
एलिट आणि प्लेट या दोन्ही विभागांमध्ये जेतेपद पटकाणारा हृषीकेश हा एकमेव कर्णधार आहे. महाराष्ट्रानंतर हृषीकेश मध्य प्रदेशकडून खेळला आणि त्यानंतर त्याने राजस्थानकडून खेळणे पसंत केले. २०१०-११ आणि २०११-१२ या वर्षीच्या रणजी जेतेपद पटकावलेल्या संघाचा हृषीकेश सदस्य होता.

फलंदाजी करण्याची ऊर्जा अजूनही माझ्यामध्ये आहे, पण दर्जेदार क्षेत्ररक्षण माझ्याकडून सध्याच्या घडीला होताना दिसत नाही. त्यामुळे संघातील जागा अडवण्यापेक्षा युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर प्रशिक्षण देण्याचा माझा मानस आहे.
– हृषीकेश कानिटकर