भारताच्या समीर वर्मा याने अव्वल मानांकनास साजेसा खेळ करीत येथे हैद्राबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. दुहेरीत भारताच्याच सात्विकसाईराज रान्किरेड्डी व चिराग शेट्टी यांना विजेतेपद मिळाले.

वर्मा याने मलेशियाच्या सुंग जो व्हेन याच्यावर २१-१५, २१-१८ अशी मात केली. त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ करीत हा सामना सरळ दोन गेम्समध्ये जिंकला. दुहेरीत रान्किरेड्डी व शेट्टी यांना इंडोनेशियाच्या अकबर बिन्तांग काहेयोनो व मोहरेझा पहलवी इस्फाहानी यांच्याविरुद्ध २१-१६, २१-१४ असा सरळ दोन गेम्समध्ये विजय मिळाला.

मिश्रदुहेरीत मात्र भारताच्या प्रणव जेरी चोप्रा व एन.सिक्की रेड्डी यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना अंतिम फेरीत सहाव्या मानांकित अकबर काहेयोनो व विनी ओक्ताविना कांडोवो यांनी १५-२१, २१-१९, २५-२३ असे तीन गेममध्ये पराभूत केले.

तिहेरी उडीत अरपिंदरला कांस्य

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सोनेरी कामगिरीपाठोपाठ अरपिंदरसिंग या भारताच्या धावपटूने तिहेरी उडीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याने येथे सुरू असलेल्या आंतरखंडीय चषक मैदानी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अरपिंदर याने कांस्यपदक मिळविताना १६.५९ मीटर अशी कामगिरी केली. त्याने जकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक व जागतिक विजेता ख्रिस्तियन टेलर या अमेरिकन खेळाडूने येथे सुवर्णपदक जिंकताना १७.५९ मीटर अशी कामगिरी केली. ह्य़ुजेस फॅब्रिस झांगो याला रौप्यपदक मिळाले. त्याने १७.०२ मीटपर्यंत उडी मारली.