बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात अफगाणिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम बांगलादेशला फलंदाजीचे आमंत्रण दिले. बांगलादेशने सावध सुरुवात करत ४ षटकांत २३ धावा केल्या. पण पुढच्याच षटकात बांगलादेशला पहिला धक्का बसला. १७ चेंडूत १६ धावा करणारा आणि २ चौकार लगावणारा लिटन दास हा बचावात्मक फटका खेळताना बाद झाला.

पहिल्या ४ षटकात लिटन दास काय पद्धतीने फलंदाजी करतो, हे पाहून मुजीब उर रहमानने त्या प्रकारे क्षेत्ररक्षक ठेवले. त्यात एक क्षेत्ररक्षक ड्राईव्हच्या फटक्याच्या अगदी समोर ठेवला आणि नियोजनबद्ध पद्धतीने चेंडू फेकत त्याला त्या क्षेत्ररक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. हसमतुल्लाह शाहिदी याने जमिनीच्या अगदी जवळ असताना तो चेंडू हलकेच झेलला आणि लिटन दासला माघारी पाठवले.

हा पहा व्हिडीओ –

हसमतुल्लाह शाहिदीने झेल पकडल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जल्लोष केला. पण लिटन दासला मात्र तो झेल पकडल्याचे मान्य असल्याचे दिसले नाही. त्यामुळे त्याने खेळपट्टीवरच उभे राहणे पसंत केले. अखेर तिसऱ्या पंचांची (TV पंच) मदत घेण्यात आली. त्यावेळी चेंडू झेलताना हसमतुल्लाह शाहिदीची बोटं चेंडूच्या खाली असल्याचे स्पष्ट झाले आणि लिटन दासला माघारी परतावे लागले.

दरम्यान, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राखण्यासाठी जिगरबाज बांगलादेशला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झगडायला लावणाऱ्या अफगाणिस्तानला कमी लेखणे बांगलादेशला महागात पडू शकेल. इंग्लंडचा शुक्रवारी श्रीलंकेने पराभव केल्यामुळे आता विश्वचषकामधील रंगत वाढली आहे. उपांत्य फेरीच्या स्थानासाठी बांगलादेशसुद्धा शर्यतीत आहे.