अंतिम फेरीत यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान

कामगिरीचा आलेख उंचावत भारतीय संघाने युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आतापर्यंत भारताने पाच अंतिम फेरीत स्थान पटकावले असून तीन वेळा विश्वचषकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे विश्वविजयाचा चौकार मारण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. अंतिम फेरीत भारतापुढे आव्हान असेल ते ऑस्ट्रेलियाचे. भारताने साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाला सहज पराभूत केले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ विजयातील सातत्य कायम राखून विश्वचषक पटकावणार, की ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवाची सव्याज परतफेड करणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

राहुल द्रविडचे मार्गदर्शन आणि पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची या स्पर्धेतील कामगिरी चांगलीच बहरत आहे. भारताने साखळी फेरीत तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशला पराभूत केले होते. उपांत्य फेरीत पाकिस्तानला २०३ धावांनी धूळ चारीत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघ हा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये आतापर्यंत वरचढ राहिलेला आहे. पृथ्वी, शुबमान गिल यांनी आतापर्यंत सातत्यपूर्ण धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये कमलेश नागरकोटी, इशान पोरेल, शिवम मावी यांनी भेदक मारा करीत प्रतिस्पध्र्याना लोटांगण घालायला भाग पाडले आहे. सध्याचा भारतीय संघाची कामगिरी पाहता, ते विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलियाला साखळी सामन्यात फक्त भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळाले आहे. वातावरण आणि खेळपट्टय़ा यांचा अचूक अंदाज ऑस्ट्रेलियाला असेल, त्याचबरोबर भारताविरुद्धच्या पराभवाचे दडपणही त्यांच्यावर असेल. पण ऑस्ट्रेलियाने दडपण न घेतला खेळ केला तर ते भारतीय संघाला चांगली लढत देऊ शकतील.

भारत सहाव्यांदा अंतिम फेरीत

भारताने २००० (मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली), २००८ (विराट कोहली), २०१२ (उन्मुक्त चंद) अशा तीन वेळा युवा विश्वचषक जिंकला, तर २००६ (चेतेश्वर पुजारा) आणि २०१६ (इशन किशन) अशा दोन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०१२मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वविजेतेपद पटकावले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी या वेळी भारताला असेल. तसेच द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा आणि एकंदर सहाव्यांदा युवा विश्वचषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत खेळत आहे.