विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेला अखेरीस सूर गवसला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करताना अजिंक्यने अर्धशतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस १ विकेटच्या मोबदल्यात ३६ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी सावध सुरुवातीनंतर गिल आणि पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्यने एक बाजू लावून धरत संघाचं आव्हान कायम राखलं. दुसऱ्या दिवशी चहापानाच्या सत्रापर्यंत भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंत मजल मारली. चहापानाच्या सत्राआधी मेलबर्नमध्ये पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला.

अजिंक्यने हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांच्यासोबत अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला वरचढ होण्याची संधी दिली नाही. विहारी आणि पंत माघारी परतल्यानंतर अजिंक्यने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानिमीत्ताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्यला स्थान मिळालं आहे.

कर्णधार या नात्याने अजिंक्यने पहिल्या दिवसाच्या खेळात आपली चमक दाखवली. गरजेनुसार योग्य बॉलिंग चेंज, फिल्ड प्लेसमेंट अशा निर्णयांमधून त्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांवर रोखलं.