विराट अँड कंपनीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना ३१ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठी दिलेले ३२३ धावांचे आव्हान त्यांना पार करता आले नाही. त्यांचा दुसरा डाव २९१ धावांतच संपुष्टात आला आणि भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.

भारताने अॅडलेडवर हा सामना जिंकून १५ वर्षांपासूनची पराभवाची मालिका खंडित केली. भारताने या आधी २००३ साली या मैदानावर सामना जिंकला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आजचा सामना पाहून त्या सामन्याची आठवण झाली. भारताला विजयाच्या शुभेच्छा देणारे ट्विट सचिनने केले. आजच्या विजयामुळे २००३ साली झालेल्या सामन्यातील विजयाच्या आठवणींना उजाळा मिळाला, असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

२००३ साली भारताने अॅडलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला ४ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात द्रविडने पहिल्या डावात २३३ तर दुसऱ्या डावात नाबाद ७२ धावा केल्या होत्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता. या खेळीसाठी द्रविडला सामनावीर घोषित करण्यात आले होते.

दरम्यान, व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.