लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघात स्थान मिळालेल्या रोहित शर्माने, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. पहिल्या डावात १७६ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक सुरुवात करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. रोहित शर्माने दुसऱ्या डावात षटकार खेचत माजी खेळाडू नवज्योतसिंह सिद्धू यांना मागे टाकलं आहे.

रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात ९ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना ६ षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात ३ षटकार खेचत रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी १९९४ साली श्रीलंकेविरुद्ध लखनौ कसोटीत ८ षटकार ठोकले होते.

याचसोबत कसोटी, टी-२० आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात भारताला कडवी झुंज देत ४३१ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात सलामीवीर मयांक अग्रवाल झटपट माघारी परतला, मात्र त्यानंतर रोहित शर्माने पुजाराच्या साथीने डाव सावरत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली.