भारतीय संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. त्याआधी झालेल्या ३ दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. सराव सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, उमेश यादव या खेळाडूंनी आपली चमक दाखवत कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे आता कसोटी मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर कसोटी मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण या वेळी भारतीय संघातील खेळाडू एका वेगळ्याच रूपात दिसणार आहेत. पूर्वी कसोटी सामन्यात केवळ पांढऱ्या रंगाचा गणवेश आणि क्रिकेट मंडळाचा लोगो असायचा, पण आता मात्र टी शर्टवर नंबर आणि नावदेखील असणार आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंचा हा नवा अवतार इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो स्टोरीवर ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, भारत आणि विंडिज यांच्यात २२ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. ही मालिका टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत खेळण्यात येणार आहे. २ सामन्यांची ही मालिका असून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ दमदार तयारी करत आहेत. भारत-विंडिज पहिला सामना २२ ते २६ ऑगस्ट तर दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.