भारतीय संघाचा सध्या विंडिज दौरा सुरू आहे. भारताने या दौऱ्यातील टी २० मालिका ३-० अशी खिशात घातली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसाने रद्द करण्यात आला. रविवारी या मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विंडिजचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विंडिज निवड समितीने शनिवारी (१० ऑगस्ट) १३ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या संघात ६ फूट ५ इंच उंच असलेल्या रहकीम कॉर्नवॉल याला संघात स्थान देण्यात आला आहे.

२२ ऑगस्टपासून ही मालिका सुरू होणार आहे. २ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ ते २६ ऑगस्ट तर दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. हे दोन सामने टेस्ट चॅम्पियनशीप म्हणजेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणार आहेत.

विंडिजचा संघ – जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमर्थ ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रॉस्टन चेस, रहकीम कॉर्मवेल, शेन डावरिच, शॅनन गॅब्रियल, शिमरॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच

अशी रंगेल जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (Test Championship)

  • ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेपासून या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
  • पुढील दोन वर्षांतील सर्व कसोटी मालिका या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहेत.
  • स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका अशा ३१ मार्च, २०१८ रोजी जागतिक क्रमवारीत पहिल्या नऊ स्थानांवर असलेल्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.
  • स्पर्धेत २७ मालिकांमधील ७१ सामन्यांचा समावेश आहे.
  • प्रत्येक संघाच्या वाट्याला स्पर्धेत एकूण सहा कसोटी मालिका खेळायला मिळणार. सहा मालिकांपैकी मायदेशात ३ तर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात ३ मालिका खेळल्या जाणार.
  • प्रत्येक विजय, बरोबरी किंवा अनिर्णित सामन्याचे गुण मिळणार. पण पराभूत संघाला मात्र गुण दिले जाणार नाहीत.
  • दोन अव्वल संघांमध्ये इंग्लंड येथे जून १० ते १४ जून २०२१ मध्ये अंतिम सामना रंगणार आहे.