News Flash

ऐतिहासिक यशाचा भारताचा निर्धार!

अखेर पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या रणधुमाळीला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे.

करोनाचे आव्हान पेलत टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ

पीटीआय, टोक्यो

अखेर पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या रणधुमाळीला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. एकीकडे सर्वाधिक प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आणि त्याचवेळी करोनासारख्या भयंकर साथीवर विजयश्री मिळवण्याच्या निर्धाराने भारताचे १२० महारथी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदा भारताचे शिलेदार ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करतील, हीच आशा देशभरातील चाहते बाळगून आहेत.

गतवर्षी करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक लांबणीवर टाकण्यात आले. यंदाही करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. मात्र जैव-सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत स्पर्धेच्या आयोजनासाठी ऑलिम्पिकनगरी सज्ज झाली आहे. २०४ देशांच्या ११ हजारांहून अधिक खेळाडूंमध्ये पदकांसाठी चढाओढ रंगणार आहे. उद्घाटन सोहळ्यात बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम आणि हॉकीपटू मनप्रीत सिंग भारताचा तिरंगा फडकावणार असून त्यानंतर पुढील १६ दिवस आपले खेळाडू पदकासाठी सर्वस्व पणाला लावतील. भारताच्या चमूत ६८ पुरुष आणि ५२ महिला खेळाडूंचा समावेश आहे.

नेमबाजीमध्ये युवा मनू भाकर, सौरभ चौधरी यांच्यासह अनुभवी राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांनी गेल्या दोन वर्षांत पदकांचा धडाका लगावला असून ऑलिम्पिकमध्येही त्यांच्याकडून त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. लंडन येथील २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके कमावली होती. त्यावेळच्या पदकविजेत्यांपैकी मेरी कोम यंदाही बॉक्सिंगमध्ये भारताच्या आव्हानाची धुरा वाहील.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यंदा सुवर्णावर मोहोर उमटवण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेरील घटनांमुळे कुस्ती क्रीडाप्रकार चर्चेत आला असला, तरी बजरंग पुनिया, विनेश फोगट पदक जिंकण्यासाठी आतुर आहेत.

स्टीपलचेसपटू अविनाश साबळेवर प्रामुख्याने महाराष्ट्रातील चाहत्यांचे खास लक्ष असेल. भालाफेकपटू नीरज चोप्रासुद्धा पदकाचा दावेदार आहे. त्याशिवाय जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारी तिरंदाज दीपिका कुमारी पदकाचा वेध घेईल, अशी आशा आहे. हॉकीमधील सुवर्णकाळ परत आणण्याचे आव्हान मनप्रीतच्या योद्धय़ांपुढे असेल. आठ वेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या हॉकी संघाला १९८०नंतर एकदाही अशी कामगिरी करता आलेली नाही.

वेटलिफ्टिंग आणि तलवारबाजी यांमध्ये अनुक्रमे मीराबाई चानू आणि सीए भवानी देवी या एकमेव महिला खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याचप्रमाणे जिम्नॅस्टिक्स, जुडोमध्येही भारताने एकेक खेळाडू रिंगणात उतरवला आहे. जलतरणमध्ये प्रथमच भारताचे तीन जण ऑलिम्पिकसाठी पात्र झाले असून टेनिसमध्ये अनुभवी सानिया मिर्झाच्या साथीने अंकिता रैना खेळताना दिसेल. त्याशिवाय सुमीत नागललासुद्धा नशीबाच्या बळावर ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता हे सर्व क्रीडापटू मिळून भारताला प्रथमच ऑलिम्पिकमध्ये पदकांचा दुहेरी आकडा गाठून देणर का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेमधील सुवर्णपदक विजेत्याला ७५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल. याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकाच्या संघटनेला २५ लाख रुपये रक्कमही दिली जाणार आहे, अशी घोषणा गुरुवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) केली. ‘आयओए’च्या सल्लागार समितीने रौप्यपदक विजेत्याला ४० लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या प्रत्येक क्रीडापटूला एक लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे.

सुवर्णपदक विजेत्याला ७५ लाखांचे इनाम

२५ भारत २५व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असून नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २८ पदके भारताने २४ ऑलिम्पिक स्पर्धात जिंकली आहेत.

१३ गेल्या १३ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८मध्ये भारताने ऑलिम्पिकमधील अखेरचे सुवर्णपदक जिंकले आहे. त्यावेळी नेमबाज अभिनव बिंद्राने हा पराक्रम केला होता.

पदकाचे दावेदार

’ नेमबाजी : राही सरनोबत,

मनू भाकर, सौरभ चौधरी

’ बॅडमिंटन : पी. व्ही सिंधू, चिराग शेट्टी-सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी

’ कुस्ती : बजरंग पुनिया,

विनेश फोगट

’ तिरंदाजी : दीपिका कुमारी,

अतानू दास

’ अ‍ॅथलेटिक्स : अविनाश साबळे, नीरज चोप्रा

’ बॉक्सिंग : मेरी कोम,

अमित पांघल

’ टेबल टेनिस : शरथ कमल-मनिका बत्रा

’ हॉकी : भारताचा पुरुष संघ

सुमितची सलामी डेनिसशी

भारताचा टेनिसपटू सुमित नागलची शुक्रवारी पुरुष एकेरीत उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनशी सलामीची लढत होणार आहे. मोठय़ा संख्येने टेनिसपटूंनी माघार घेतल्यामुळे गेल्या आठवडय़ात सुमित ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. जागतिक क्रमवारीत १६०व्या क्रमांकावर असलेल्या २३ वर्षीय सुमितने पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडल्यास दुसऱ्या फेरीत तो रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवशी सामना करील. मेदव्हेदेवची सलामी अ‍ॅलेक्झांडर बुब्लिकशी होणार आहे. महिला दुहेरीत सहा ग्रँडस्लॅम विजेती सानिया मिर्झा अंकिता रैनाच्या साथीने युक्रेनच्या नाडिया आणि लायुडमायला या किशेनॉक भगिनींशी सामना करणार आहे.

बॉक्सिंगपटूंपुढे खडतर आव्हान

ऑलिम्पिक बॉक्सिंगची कार्यक्रमपत्रिका गुरुवारी जाहीर झाली असून, यात भारतीय बॉक्सिंगपटूंपुढे खडतर आव्हान असणार आहे. अग्रमानांकित अमित पांघल (५२ किलो) याच्यासह चौघांना उपउपांत्यपूर्व फेरीत पुढे चाल दिली आहे. भारताचे नऊ बॉक्सिंगपटू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले असून, २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये एकही पदक आपल्याला मिळाले नव्हते. महिलांमध्ये सहा वेळा विश्वविजेती एम. सी. मेरी कोम २५ जुलैला डॉमिनिकाच्या मिग्वेलिना हर्नाडिझशी सामना करणार आहे.

सुशीलाची गाठ माजी ऑलिम्पिक विजेतीशी

ज्येदोमधील भारताचे एकमेव प्रतिनिधित्व लाभलेल्या सुशीला देवी लिक्माबामला ऑलिम्पिकमधील मार्ग खडतर असेल. सलामीला तिच्यापुढे लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या हंगेरीच्या ईव्हा सीसर्नोव्हिझ्कीचे आव्हान असेल. पहिली फेरी पार करण्यात ती यशस्वी ठरली तर दुसऱ्या फेरीत २०१७मधील विश्वविजेत्या फुना टोनाकीचे आव्हान तिच्यापुढे असेल. ग्लासगोमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सुशीलाने रौप्यपदक पटकावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 3:07 am

Web Title: india determination for historic success ssh 93
Next Stories
1 दीपिकाकडे लक्ष
2 ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश
3 उद्घाटनासाठी भारताचे फक्त २८ जणांचे पथक
Just Now!
X