थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पध्रेच्या गेल्या हंगामात कांस्यपदकाची कमाई करून इतिहास घडविणाऱ्या भारतीय महिला संघाला आणखी एक पदक खुणावत आहे. अव्वल खेळाडू सायना नेहवालच्या नेतृत्वाखाली महिला संघ पुन्हा एकदा विक्रम प्रस्तापित करण्यासाठी सज्ज झाला आहे, परंतु सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या पुरुष संघाची चांगलीच कसोटी लागणार आहे.

भारतीय महिला संघाने २०१० साली क्वालालम्पूर येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या उबेर चषक स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर २०१४मध्ये नवी दिल्ली येथे त्यांनी कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. उपांत्य फेरीत त्यांना पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या जपानने ३-२ असे पराभूत केले होते. भारतासमोर २०१४ चा उपविजेता जपान, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या तगडय़ा संघाचे आव्हान आहे.

सायना आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर एकेरीची जबाबदारी असेल. तिसऱ्या एकेरी लढतीसाठी रुत्विका शिवाजी गद्दे, तन्वी लाड आणि पी. सी. तुलसी यांच्यात चुरस आहे. तीन एकेरी आणि दोन दुहेरी सामने, अशा या स्पध्रेचे स्वरूप आहे. २०१०च्या राष्ट्रकुल स्पध्रेतील सुवर्णपदक विजेती ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीवर दुहेरीची मदार असेल. त्यांना एन. सिक्की रेड्डी व के. मनीषा यांचीही सोबत आहे. भारताला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असणार आहे. त्यानंतर जर्मनी आणि जपान यांच्याशी लढत होईल.

किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांच्या अनुपस्थितीत थॉमस चषक स्पध्रेत अजय जयरामच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंडोनेशिया, थायलंड आणि हाँगकाँगचा सामना करणार आहे. जयरामला समीर वर्मा आणि सौरभ वर्मा या भावंडांची एकेरीत सोबत असणार आहे, तर ऑलिम्पिकची पात्रता मिळणारी पहिली पुरुष जोडी मनु अत्री व बी. सुमिथ रेड्डी यांच्यावर दुहेरीची धुरा असेल. अक्षय देवळकर, आर. सत्विक साई राज आणि चिराग शेट्टी यांच्यात दुसऱ्या दुहेरी जोडीसाठी चुरस आहे. ‘श्रीकांत आणि प्रणॉय यांच्या अनुपस्थितीने आम्हाला पिछाडीवर टाकले आहे, परंतु समीर आणि साई यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि आम्ही चांगला निकाल लावू,’ असे मत जयरामने व्यक्त केले.