टीम इंडियाविरुद्ध कसोटी आणि टी२० मालिका गमावलेल्या इंग्लंड संघाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. पुण्यात काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांना ६६ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला, यासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड आता ०-१ ने पिछाडीवर आहेत. त्यामुळे २६ मार्च रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना जिंकणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, पण या सामन्यापूर्वी इंग्लंडसाठी एक वाईट बातमी आली आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन आणि यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्स यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाले होते. त्यामुळे दोघांनाही मैदान सोडावं लागलं होतं. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलर याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. क्षेत्ररक्षण करताना मॉर्गनच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली, नंतर चार टाके मारुन तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण ३० चेंडूत केवळ २२ धावा बनवून तो बाद झाला. तर, क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर एक चौकार अडवताना बिलिंग्स जायबंदी झाला. त्याच्या गळ्याच्या हाडाला दुखापत झाली. जखम असतानाही बिलिंग्स देखील फलंदाजीसाठी मैदानात उतरला, पण त्यालाही केवळ १८ धावाच करता आल्या. दरम्यान सामना संपल्यानंतर याबाबत बोलताना, “पुढील सामन्याआधी ४८ तास आम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे…शुक्रवारच्या सामन्याआधी ही दुखापत बरी होण्यासाठी शक्य तेवढा वेळ देऊ” असं मॉर्गन म्हणाला.

जर दुसऱ्या सामन्याआधी मॉर्गन आणि बिलिंग्सची दुखापत बरी झाली नाही तर मालिकेत आधीच १-० ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंडच्या अडचणी नक्कीच वाढतील. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात भारताचेही दोन महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झालेत. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे दोघे जायबंदी झाले असून पुढील सामन्यापर्यंत रोहित फिट होण्याची शक्यता आहे, पण डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.