इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत सर्वाच्याच नजरा भारतीय कर्णधार विराट कोहलीवर खिळल्या आहेत. २०१४च्या दौऱ्यात त्याला आलेले अपयश आजही चाहत्यांना सलते. त्यामुळेच या दौऱ्यात कोहलीसाठी पहिल्या २० धावा करणे सर्वात कठीण तसेच महत्त्वाचे असणार आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केली.

‘‘कोहली हा एक आक्रमक खेळाडू असून त्याला नेहमीच पुढे येऊन संघाची धुरा वाहायला आवडते. गेल्या इंग्लंड दौऱ्यात सपशेल अपयशी ठरल्यामुळे साहजिकच या वेळी त्याच्यावर सर्वाचेच लक्ष आहे,’’ असे राजपूत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘‘२०१४च्या कसोटी मालिकेला आता चार वर्षे लोटली असून या काळात कोहली एक प्रगल्भ खेळाडू म्हणून उदयास आला आहे. आपण त्याला काही सांगण्यापेक्षा तो स्वत: त्याची जबाबदारी चांगलीच ओळखतो. इंग्लंडच्या जेम्स अँडरसन व ख्रिस ब्रॉडपुढे त्याची झुंज पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. मात्र या मालिकेत यशस्वी होण्यासाठी त्याला फक्त पहिल्या २० धावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या कसोटीत त्याने एकदा का २० धावांचा टप्पा ओलंडला, तर त्याला रोखणे किती कठीण आहे, याची जाणीव इंग्लंडच्या गोलंदाजांना असेलच.’’

‘‘गेल्या अनेक वर्षांतील कोहलीची कामगिरी पाहिल्यास त्याचे अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्याची सरासरी इतरांपेक्षाही सरस आहे, हे दिसून येते. १० वर्षांच्या कारकीर्दीत त्याने भारतासाठी अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत व इंग्लंडमध्येही तशीच कामगिरी करण्यासाठीही तो उत्सुक असेल,’’ असे राजपूत म्हणाले. याव्यतिरिक्त, भारताने पहिल्या कसोटीत तीन वेगवान व दोन फिरकीपटूंसह उतरावे अशी इच्छाही राजपूत यांनी व्यक्त केली आहे.