20 November 2017

News Flash

भारतीय महिला संघाचा सलग चौथा पराभव

रॅचेल मॅक्कॅनचा दुहेरी धमाका

पीटीआय, हॅमिल्टन | Updated: May 20, 2017 2:58 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

न्यूझीलंडकडून ३-० अशी मात ; रॅचेल मॅक्कॅनचा दुहेरी धमाका

भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध चालू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग चौथ्यांदा हार पत्करली. चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ३-० असा धुव्वा उडवला. पहिल्या तीन सामन्यांत अनुक्रमे ४-१, ८-२ आणि ३-२ असा विजय मिळवल्यानंतर चौथ्या सामन्यातही किवी संघाचे वर्चस्व दिसून आले.

भारतीय खेळाडूंनी आक्रमणात सुधारणा करीत प्रतिस्पर्धी संघावर भक्कम हल्लाबोल केला; परंतु न्यूझीलंडच्या संघाने खंबीरपणे बचाव करीत हे प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या सत्रात रॅचेल मॅक्कॅनने १४ व्या मिनिटाला गोल करून न्यूझीलंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मग १७ व्या मिनिटाला टेस्सा जॉपने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून ही आघाडी २-० अशी वाढवली.

या पिछाडीनंतर भारतीय आघाडीपटूंनी पुन्हा गोल साधण्यासाठी वेगळी रणनीती वापरली; परंतु तीसुद्धा अयशस्वी ठरली. मध्यंतराआधी २६व्या मिनिटाला फॉर्मात असलेल्या रॅचेलने दुसरा गोल साकारून संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

शेवटच्या दोन सत्रांमध्ये न्यूझीलंडच्या आघाडीपटूंनी गोल साकारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यामुळे भारतीय गोलरक्षक रजनी इटीमार्पूच्या कौशल्याचा कस पाहायला मिळाला. तिला बचावपटूंनी बहुमोल साथ दिल्यामुळे मध्यंतरानंतर न्यूझीलंडला गोल साकारता आला नाही.

नवज्योत कौरचे शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात खेळणाऱ्या मध्यरक्षक नवज्योत कौरने भारताकडून १००व्या सामन्यात प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे नवज्योतने २०१२मध्ये न्यूझीलंडविरुद्धच नॅपियर येथे झालेल्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

First Published on May 20, 2017 2:58 am

Web Title: india vs new zealand womens hockey