पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळी करावी, हे भारतीय संघात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारताचा युवा खेळाडू हार्दिक पांड्याचे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत हे स्वप्न पूर्ण झाले. युवराज सिंग बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात मैदानात आलेल्या पांड्याने दमदार फटकेबाजी करत अवघ्या सहा चेंडूत २० धावा ठोकल्या. भारतीय युवा खेळाडूतील जोश काय असतो, याची प्रचितीच त्याने सामन्याच्या अखेरच्या षटकात दिली. हसन अलीने ४७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर युवराजला बाद केल्यानंतर पांड्या मैदानात आला. ४७ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पांड्याने एक धाव घेतली. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याकडे स्ट्राइक होता. या षटकात भारत किती धावा जमवेल याचा अंदाज प्रत्येक चाहता बांधत होता. केवळ एक चेंडू खेळलेल्या पांड्या सेट होण्यासाठी वेळ न घेता एक धाव काढून विराट कोहलीकडे स्ट्राइक देईल का? असा प्रश्नही काही क्रिकेट जाणकारांना पडला असेल.

मात्र, पाकिस्तान विरुद्धची दमदार खेळी करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. इमाद वासिमच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून पांड्याने त्याच्यातील जोश दाखवून दिला. पांड्याने या षटकात लागोपाठ तीन उत्तुंग षटकार खेचले. चौथा चेंडू खेळताना तो डगमगला पण तोपर्यंत तीन चेंडूत मिळालेल्या १८ धावांनी भारताने पाकिस्तानसमोर मोठी धावसंख्या उभारली होती. पाचव्या चेंडूत कसलेल्या फलंदाजाप्रमाणे एक धाव घेत त्याने विराटला स्ट्राइक दिला. विराटने चेंडू सीमेपलीकडे पाठवत भारताची धावसंख्या ३१९ पर्यंत नेऊन ठेवली. या सामन्यात भारताच्या प्रत्येक फलंदाजाने साजेशी खेळी केली. नव्या दमाच्या पांड्या ६ चेंडूत २० धावा ठोकून नाबाद राहिला. प्रत्येक खेळाडूने नावाला साजेशा खेळ केला पण पांड्याची फिनिशिंग टच लक्षात राहिल असाच होता.