दीड वर्षांनंतर राष्ट्रीय संघात पुनरागन करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत लक्षवेधी कामगिरी केली आहे. ही मालिका कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरेल, असा विश्वास उनाडकटने व्यक्त केला.

वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने पाच विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेत निभ्रेळ यश मिळवले. २६ वर्षीय उनाडकटने १५ धावांत २ बळी घेऊन सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले. त्याने कटकच्या पहिल्या सामन्यात ७ धावांत एक बळी आणि इंदूरच्या दुसऱ्या सामन्यात २२ धावांत एक बळी घेतला होता. त्यामुळेच मालिकावीरासाठी त्याची निवड झाली.

सामन्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेविषयी उनाडकट म्हणाला, ‘‘या मालिकेतील कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास मला मिळाला आहे. याआधीसुद्धा स्थानिक क्रिकेटमध्ये मी उत्तम कामगिरी केली, तेव्हा संधी मिळाली होती.’’

‘‘याआधी जेव्हा भारताकडून खेळलो होतो, तेव्हा माझ्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. मात्र ही मालिका माझ्या कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली आहे. त्यामुळेच मी आनंदी आहे,’’ असे उनाडकटने सांगितले.

उनाडकटने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटी पदार्पण केले होते. नंतर २०१३ मध्ये ७ एकदिवसीय सामने तो खेळला. मग जून २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ट्वेन्टी-२० मध्ये पदार्पण केले. त्यानंतर दीड वर्षांनी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झोकात पदार्पण केले.