भारत माता की जय.. वंदे मातरम.. या जयघोषांनी ‘द मॉल’मधील शरीरसौष्ठव सभागृह दणाणून गेले, निमित्त होते ते सातव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेचे. जवळपास पाचशे स्पर्धक आणि तब्बल ४५ देशांमधल्या या स्पर्धेत भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी पुरुषांच्या सांघिक विजेतेपदामध्ये तिसरा क्रमांक पटकावत तिरंगा फडकावला. या स्पर्धेत भारताने एकूण अकरा पदकांची कमाई केली, यामध्ये चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. रविवारी जगदिश लाड आणि विपीन पीटर यांनी प्रत्येकी रौप्यपदक पटकावले. सर्व गटांमधील अव्वल शरीरसौष्ठवपटूंमध्ये झालेल्या ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ स्पर्धेत इराणचा करिम शाहरोखी जेता ठरला. सांघिक जेतेपदाच्या स्पर्धेत ४३० गुणांसह यजमान थायलंडने बाजी मारली, त्यानंतर इराणने ४०० गुणांसह दुसरे स्थान पटकावले, तर भारताला ३०० गुणांसह तिसरे मिळाले.
रविवारी रंगलेल्या भव्य स्पर्धेमध्ये भारताने दोन रौप्य पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या जगदीश लाडने ९० किलो वजनीगटामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली खरी, पण त्याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटामध्ये कुवैतच्या तारेख अलशख्सने सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या ८५ किलो वजनीगटामध्ये भारताच्या विपीन पीटर आणि मोहम्मद अश्रफ यांनी अव्वल पाच जणांमध्ये स्थान मिळवले होते. पण भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. विपीनला या गटात रौप्यपदक मिळाले, तर अश्रफला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
शनिवारी फिटनेस आणि फिजिक या गटामध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या महाराष्ट्राच्या अनूपसिंग राठोरला मात्र रविवारी पदक पटकावता आले नाही. पुरुषांच्या अ‍ॅथलेटीक आणि फिजिक (उंची १८० सेंमी.वरील गट) स्पर्धेत अनूपला चौथा क्रमांक मिळाला.
भारताला महिलांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता राठोरकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या. पण शनिवारप्रमाणेही तिला रविवारी पदक पटकावता आले नाही. महिलांच्या अ‍ॅथलेटीक आणि फिजिक (उंची १६५ सेंमी. वरील गटात) या स्पर्धेत चौथे स्थान मिळाले.

भारताचा चढता आलेख
दोन वर्षांपूर्वी झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताला तिसरे स्थान मिळाले होते. गेल्या वेळी मुंबईत झालेल्या स्पर्धेत इराणने पहिले, तर भारताने दुसरे स्थान मिळवले होते, पण या वेळी मात्र दमदार कामगिरी करत भारताने सांघिक जेतेपद पटकावले.