* १ ते ४ डिसेंबरमध्ये पटायात स्पर्धेचा थरार

* किरण पाटील, जगदीश लाड, बॉबी सिंगकडून मोठय़ा अपेक्षा

जागतिक शरीरसौष्ठव स्पध्रेत सोनेरी कामगिरी करण्यासाठी भारताचे बलशाली खेळाडू सज्ज झाले आहेत. जागितक स्पर्धेसाठी पहिल्यांदाच भारताचा ६० जणांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ जात असून त्यांच्याकडून एकूण १५ पदकांची अपेक्षा आहे. किरण पाटील, जगदीश लाड, बॉबी सिंग, बी. महेश्वरनसारख्या शरीरसौष्ठवपटूंकडून भारताला मोठय़ा अपेक्षा असतील. शरीरसौष्ठव स्पर्धेबरोबरच भारताचे फिजीक फिटनेस विभागातही कडवे आव्हान असेल, कारण भारताचे ११ खेळाडू या विभागात सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा  १ ते ४ डिसेंबरदरम्यान थायलंडमधील पटाया येथे होणार आहे.

[jwplayer 1G6YlsuX]

या स्पर्धेत ५७ देशांमधील पाचशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार असून इराण, हंगेरीसारख्या संघाकडून भारताला कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. फिजीक फिटनेस प्रकारात  सोनिया मित्रा तर शरीरसौष्ठव स्पध्रेत सरिता देवी,ममोता देवी, रबिता देवी आपले कौशल्य पणाला लावतील. एकूण विविध गटात भारताच्या सात महिला खेळणार आहेत.

‘यापूर्वी झालेल्या स्पर्धेचा मला अनुभव आहे. त्यावेळी मला सुवर्णपदक जिंकता आले नव्हते, पण ती कसर यावेळी मी पूर्ण करेन. या वेळी देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा माझा निर्धार आहे. थायलंडमध्ये माझ्यामुळे राष्ट्रगीताची धून वाजेल, अशी मला आशा आहे’ असे आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड म्हणाला.

‘यावेळी भारताचा ६० जणांचा संघ स्पर्धेसाठी जात आहे. सर्व खेळाडूंचे मनोबल कसे उंचावता येईल, याकडे माझे लक्ष असेल. पण देशवासियांनीही त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे,’ असे संघाचे प्रशिक्षक प्रवीण सकपाळ यांनी सांगितले.

‘गेल्या वर्षी झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पध्रेतही भारतान चार सुवर्णासह अकरा पदके जिंकली होती. यावेळी आम्ही नक्कीच त्यापेक्षा जास्त पदके जिंकू, अशी खात्री भारतीय शरीरसौष्ठवाचा संघ पाहिल्यावर होते. भारतीय संघाची तयारी पाहून भारताला सुवर्णासह किमान १५  पदके हमखास मिळतील,’ भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस असा विश्वास पाठारे यांनी व्यक्त केला आहे.

परीक्षकांना स्पर्धासाठी मार्गदशन शिबीर

महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेच्यावतीने परिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये खेळ अधिक पारदर्शक कसा करता येईल आणि खेळाचा स्तर कसा वाढवता येईल, याबाबतचे मार्गदर्शन चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव विक्रम रोठे आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले.

[jwplayer UyWFIua2]