मिश्र दुहेरीत सुवर्ण

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा

भारतीय खेळाडूंनी सांघिक विभागापाठोपाठ वैयक्तिक विभागातही दबदबा कायम राखला. त्यांच्या मौमा दास व मनिका बात्रा यांनी महिलांमध्ये तर सौम्यजित घोष, अ‍ॅन्थोनी अंमलराज व सानिल शेट्टी यांनी पुरुषांमध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले. मिश्रदुहेरीत भारताच्या अंकिता दास व जी. साथियन यांनी विजेतेपद मिळविले. आतापर्यंत या स्पर्धेत भारताची सोळा पदके निश्चित झाली आहेत. दीनदयाळ उपाध्याय स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील मिश्रदुहेरीत अंकिता व साथियन यांनी मौमा दास व सौम्यजित घोष यांच्यावर ११-७, ८-११, १५-१३, ११-७ अशी मात केली.

मौमाने आपलीच सहकारी पूजा सहस्रबुद्धेला ११-६, ८-११, ११-७, १२-१०, ८-११, १०-१२, ११-८ असे पराभूत केले. उत्कंठापूर्ण लढतीत पूजाला उंचीचा फायदा घेता आला नाही. निर्णायक गेममध्ये तिने परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवले नाही अन्यथा तिला विजय मिळविता आला असता. मौमाने चॉप्स, काऊंटर अ‍ॅटॅक असा सुरेख खेळ केला. सकाळच्या सत्रात पूजाने वेल्सच्या कॅरी चालरेटीवर सनसनाटी विजय नोंदविला होता. मनिकाने इंग्लंडच्या हो तिन तिन हिच्यावर ११-६, ११-६, २-११, ११-७, ११-२ अशी मात केली. मनिका हिने टॉपस्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला.

भारताच्या अंकिता दासला चुरशीच्या लढतीत सिंगापूरच्या लिन येईकडून पराभव स्वीकारावा लागला. रंगतदार झालेला हा सामना येईने ९-११, ९-११, ११-८, ११-९, ११-६, ११-८ असा जिंकला. पहिल्या दोन गेम्स घेतल्यानंतरही अंकिताला फायदा घेता आला नाही. सिंगापूरच्या झोऊ  यिहानने के. शामिनी या भारतीय खेळाडूला ११-१३, ११-८, ६-११, ११-८, ११-२, ११-७ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत यिहान व मनिका यांच्यात लढत होईल, तर मौमाला येईशी खेळावे लागणार आहे.

पुरुषांच्या एकेरीत घोषने केविन रामगे या स्कॉटिश खेळाडूला      ४-० अशा गेम्सने हरविले. सानिलने आपलाच सहकारी हरमित देसाई याचे आव्हान ४-३ अशा गेम्सने संपुष्टात आणले. अंमलराज याने आपलाच सहकारी अभिषेक यादव याचा ४-० असा धुव्वा उडविला. मात्र भारताच्या जी. साथियन याला पराभव स्वीकारावा लागला. सिंगापूरच्या चेन फेंग याने त्याला ४-२ असे पराभूत केले.

सायप्रसच्या खेळाडूवर कारवाई

सामना सुरू असताना स्वत:कडून चूक झाल्यामुळे सायप्रसच्या मारिओस यिआनगुओ याने गुणस्तंभास लाथ मारली. त्यामुळे पंचांनी त्याला पिवळे कार्ड दाखवीत कारवाई केली. त्याच्याबाबत संयोजकांकडून आंतरराष्ट्रीय महासंघाकडे अहवाल पाठविला जाणार आहे.